पुणे | दि.३० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे ग्रामीण पोलिसांनी पॉर्न व्हिडिओ बनवणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, त्यात पाच महिलांसह १५ जणांना अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमुन त्या पथकाने शुक्रवारी रात्री माळवली जवळील पाटण गावातील अर्णव व्हिला बंगल्यावर छापा टाकला.
ही एक मोठी टोळी असुन ते वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणींना याठिकाणी आणून पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. यातील काही व्हिडिओ पोलिसांना मिळाले असून पॉर्न फिल्म शूट करणाऱ्या १० पुरुष आणि ५ महिलांना अटक करण्यात आली आहे. तसेच बंगला भाड्याने देणाऱ्या तीन जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयपीसी कलम २९२, २९३ आणि ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखालील गुन्ह्यांसाठी त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांचे एसपी पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, एएसपी सत्य साई कार्तिक यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पीएसआय भरत भोसले, पीएसआय सागर अरगडे, एएसआय अजय दरेकर, महेंद्र वाळुंजकर, युवराज बनसोडे, तसेच पोलीस कर्मचारी बाळकृष्ण भोईर, दुर्गा जाधव, पुष्पा घुगे, रुपाली कोहिनीकर, सागर धनवे व सुरज गावडे यांचा समावेश होता.
