Headlines
Home » राजकीय » अखेर वसंत मोरेंकडून मनसेला जय महाराष्ट्र ; रात्री ‘एक्स’ वर व्यक्त केली होती नाराजी

अखेर वसंत मोरेंकडून मनसेला जय महाराष्ट्र ; रात्री ‘एक्स’ वर व्यक्त केली होती नाराजी

पुणे | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस पुणे शहराचे विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. रात्री फेसबुकवरुन त्यांनी एक पोस्ट केली होती की, ‘आता मला कोणाकडुनही अपेक्षा नाही’. त्यानंतर या पोस्ट वरुन वेगवेगळे तर्क वितर्क निघू लागले. दुपारी ‘साहेब मला माफ करा जय महाराष्ट्र’, अशी एक नवीन पोस्ट फेसबुकवर करुन राजीनाम्याचे संकेत दिले. मनसे सरचिटणीस पदाचा आणि पक्षाच्या इतर सर्व पदावरुन आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

वसंत मोरे पुढे म्हणाले की, मी गेल्या दीड महिन्यापासून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो. पण माझ्या शहरातीलच काही लोकं त्यावेळी लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते त्यांचीच आज यादी वाढत गेली. राज ठाकरे यांनी जेव्हा लोकसभेच्या दृष्टीने पुणे शहराचा अहवाल मागितला तेव्हा ह्या लोकांनी चुकीचा अहवाल पाठवून आपण किंवा मनसेने पुणे लोकसभा लढू नये असे वातावरण निर्माण केले.

मागच्या महिन्यात पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत मी लोकसभेविषयी बोलण्यासाठी वेळ मागितली होती, मात्र राज ठाकरे देखील यावर काही बोलले नाही. माझी नाराजी पक्ष किंवा पक्षप्रमुखांसोबत नसून पक्षातील काही विशिष्ट लोकांसोबत आहे. आणि अश्या ह्या लोकांसोबत राहण्याची माझी आता अजिबात इच्छा नाही, म्हणून मी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे. मागे मी ज्या भूमिका मांडल्या होत्या ,त्या बदल्यात माझ्यावरच कारवाई करण्यात आली. आता पुन्हा जर तेच होत असेल तर अशा लोकांसोबत राहून काय उपयोग? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

राजीनाम्यानंतर पुढे काय या प्रश्नावर वसंत मोरे म्हणाले की, मी अद्याप दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. पुणेकर जे सांगतिल ते मला मान्य असेल. मनसेत पुन्हा जाण्याचे सगळे मार्ग मी बंद केले आहेत. पुढील काही दिवसात मी माझी पुढील भूमिका मांडेल असे वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!