मुंबई | दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज आपण २१ व्या शतकात वावरत आहोत. २१ वे शतक हे विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे आहे. असे असले तरी हे शतक फारच धावपळीचे असल्याचे आपणाला दैनंदिन जीवनात जाणवते. आजच्या धकाधकीच्या जीवनात सामान्य जणांना स्वतःकडे व स्वतःच्या कुटुंबाकडे देखील व्यवस्थित लक्ष देता येत नाही. अशात समाजसेवा करणे हे सोपे राहिलेले नाही.
मायानगरी मुंबईत रोज हजारो लोक येतात. कोणी पोट भरण्यासाठी येतो, कोणी स्वप्नपूर्तीसाठी येतो तर काही जण कोणत्या न कोणत्या गरजेपोटी मुंबईत येतात. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातुन असेच आपली शासकीय कामे पूर्ण करण्यासाठी रोज शेकडो लोक मंत्रालयात येतात. ग्रामीण भागातून थेट मायानगरीत प्रथमच पाय ठेवणाऱ्यांना तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना मार्गदर्शनाअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच मंत्रालय परिसरात आपणाला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे एक अवलिया पोलीस अधिकारी सर्वांची सेवा करताना दिसून येतात. त्या अधिकाऱ्याचे नाव आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सांगळे. प्रेमाने व आदराने सर्वजण त्यांना दादा म्हणतात. ग्रामीण भागातून मंत्रालयात आलेल्या अनेक गरजूंना ते स्वखर्चाने मदत व मार्गदर्शन करताना रोज दिसून येतात.
संजय सांगळे यांची ही सेवावृत्ती अनेकांना प्रेरणा देते. त्यांच्या याच सेवावृत्तीचा सन्मान करण्यासाठी अपंग शासन संस्थेच्या वतीने त्यांना यावर्षीचा दिव्यांग समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेचे चेअरमन भास्कर शिरोडकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते.
