Headlines
Home » होम » शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात एक लाख सदस्य नोंदणीचे केले आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “ना झुके हैं, ना बिके हैं, ना टूटे हैं, हम बाळासाहेब के चेले हैं, खुलकर लड़े हैं और खुलकर जिए हैं !” या जोशपूर्ण शायरीने सुरुवात करत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने आयोजित जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या संवाद मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जनतेच्या हृदयाशी जोडलेली आहे. शिवसेना म्हणजे चळवळ, शिवसेना म्हणजे जनतेच्या मनातील ताकद.” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना आगामी नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणीकडे असलेल्या उदासीनतेवर त्यांनी खंत व्यक्त करत सांगितले.

“शिवसेना ही केवळ निवडणूक जिंकण्याची यंत्रणा नाही. ती बाळासाहेब ठाकरे यांची चळवळ आहे. पदाधिकाऱ्यांनी ‘सामाजिक कार्य हाच श्वास’ या भावनेने समाजात काम करावं.” “मतदारसंघ निहाय संपर्क मोहिम राबवा, गट-गणनिहाय नियोजन करा. बूथ कमिट्या, महिला आघाडी, युवासेना यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या सोपवा. किमान एक लाख कार्यकर्त्यांची विक्रमी नोंदणी करण्यासाठी कामाला लागा.” असे प्रभावी आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या संवाद मेळाव्याच्या सुरुवातीस शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने गुलाबराव पाटील यांचे  स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी बोलताना सांगितले की, “गुलाबराव पाटील यांनी जातीपातीच्या पलिकडे जाऊन विकासासाठी झटत नेतृत्व केलं. शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घ्यावी.” तसेच मुंबईप्रमाणे जळगाव ग्रामीणमध्येही लवकरच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा प्रमुख संजय पाटील सर, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनीही मनोगत व्यक्त केले. सदर मेळाव्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या मेळाव्याप्रसंगी ग्रामीण भागातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उप तालुका प्रमुख संदीप सुरळकर यांनी केले, तर आभार उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!