पुणे ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल, असेही ते म्हणाले. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महाराष्ट्र सायबरचे उप महानिरीक्षक संजय शिंत्रे, क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, क्विक हील टेक्नॉलॉजीस लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास काटकर, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, सायबर सुरक्षा ही भारतासह जगभरातील सर्वात गंभीर चिंतांपैकी एक म्हणून उदयास आली आहे, आज आपण पेमेंट देवघेव करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. अगदी अशिक्षित छोटा विक्रेता देखील डिजिटल पेमेंट स्वीकारतो. आज सायबर गुन्हेगारीत स्थिर गतीने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाला सायबर गुन्हेगारीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सामान्य नागरिक त्याचा पैसा गमावणार नाही अशी यंत्रणा आपल्याला विकसित करावी लागेल. सायबर सुरक्षेबाबत जागरूकता पसरवण्यावर अर्थात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेषत: विद्यार्थ्यांना सुरक्षित ऑनलाइन पद्धतींबद्दल शिक्षित करण्यावर भर द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
शासनाच्या सायबर शाखेतील पोलीसांनाही अशा फाउंडेशनद्वारे सायबर गुन्हेगारीच्या विरोधात कसे काम करता येईल यासाठी संगणक यंत्रणेचे पुरेसे ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगार अनेकदा इतर देशातून काम करत असल्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक असल्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यावेळी म्हणाले.