छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : येथील उस्मानपुऱ्यात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्याची त्याच्या फ्लॅटमध्ये घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी गळा चिरुन निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि.१४ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. ऐन संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९) असे असून, तो छत्रपती संभाजीनगर शहरात देवगिरी महाविद्यालयात बीसीएस च्या प्रथम वर्षात शिकत होता. तो मुळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून उस्मानपुऱ्यातील भाजीवालीबाई पुतळ्याजवळील अपार्टमेंटमध्ये ३ मित्र व मावस भावासोबत तो भाड्याने राहत होता. मिळालेल्या माहिती नुसार मंगळवारी सर्वजण महाविद्यालयातून फ्लॅटवर परतले. सायंकाळी प्रदीपचा चा मावसभाऊ आणि अन्य मित्र बाहेर गेले होते, परंतु प्रदीप मात्र फ्लॅटवर थांबला होता. मारेकऱ्यांनी डाव साधुन प्रदीप यास एकटे गाठुन त्याची हत्त्या केल्याचे कळते.
दरम्यान रात्री दहाच्या सुमारास हे सर्व फ्लॅटवर परतले. तेव्हा त्यांनी प्रदीपकडे लक्ष दिले नाही. परंतु अर्धातास होऊनही प्रदीप उठत नसल्याने एकाने पांघरूण काढले असता सर्वांना धक्काच बसला. प्रदीपचा गळा कापलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत असलेला मृतदेह पाहून त्यांनी तातडीने उस्मानपुरा पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मारेकऱ्यांना प्रदीप फ्लॅटवर एकटाच आहे, याची माहिती असावी. धारदार शस्त्राने गळ्यावर दोन वार केल्यानंतर अंथरुणावर टाकून त्याच्यावर त्यांनी पांघरूणही घातले होते.
दरम्यान शनिवार दि.११ जानेवारी रोजी प्रदीप आणि त्याच्या मित्रांचा कॉलेजमधील काही मुलांसोबत किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. एकटक का पाहतो, तू कॉलर का उडवतो, असे क्षुल्लक कारण या वादामागे होते. त्यातून त्यांच्यात त्यावेळी हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांसमोर आली. त्यामुळे पोलिसांनी महाविद्यालयातील काही तरुणांची माहिती घेतली असून प्रदीपची हत्या नेमकी कुणी आणि का केली? याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतू शनिवारी झालेल्या वादातूनच प्रदीपची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
