नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आज दि.१६ रोजी जोरदार खेळ करत कोरियन संघाचा ४-१ ने धुव्वा उडवला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे.
भारतीय संघाच्या खेळाडूंनी पहिल्या क्वार्टरमध्येच आक्रमक खेळ दाखवत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. याचा फायदा घेत पहिल्या क्वार्टरमध्ये उत्तम सिंगने उत्कृष्ट गोल केला आणि सामन्यात भारताला १-० अशी आघाडी घेत सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले. भारताने गोल करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि १९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात त्याचे फळ मिळाले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतीय संघासाठी दुसरा गोल केला. यानंतर कोरियन संघाने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.
हाफ टाइमपर्यंत टीम इंडियाकडे २-० अशी आघाडी होती. यानंतर जर्मनप्रीत सिंगने तिसरा गोल केला. भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड प्रस्थापित केली असतानांच कोरियाच्या यांग जी-हुनने उत्कृष्ट गोल नोंदवून आपल्या संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.
टीम इंडियासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगने चौथा गोल केला. त्याचा हा या सामन्यातील एकूण दुसरा गोल ठरला. या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग, उत्तम सिंग आणि जर्मनप्रीत सिंग यांनी गोल केले. भारताने सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फायनलमध्ये भारताचा सामना चीनशी होणार आहे. चीनने पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे.