Home » क्राईम » धक्कादायक : कुर्ला ते ठाणे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेत महिलेवर बलात्कार

धक्कादायक : कुर्ला ते ठाणे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेत महिलेवर बलात्कार

ठाणे | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कुर्ला आणि ठाणे रेल्वे स्थानकां दरम्यान तुलसी एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईहुन निघणाऱ्या या धावत्या एक्सप्रेस मध्ये हा प्रकार घडला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ट्रेन निघाल्यावर ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचली आणि याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने आपल्याला बेशुद्ध करुन बलात्कार करण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी जीआरपीने गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

दरम्यान या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, ठाणे जीआरपीने महिलेच्या तक्रारीनुसार कलम ३२८ आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला ही उत्तरप्रदेशात जाण्यासाठी निघाली होती आणि त्यासाठी तुलसी एक्सप्रेसमध्ये बसली. त्यानंतर जवळपास ४० मिनिटांनी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेने घटनेच्या ३९ दिवसांनी एप्रिल महिन्यात मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जीआरपीसोबत संपर्क केला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर जवळपास २१ दिवसांनी हे प्रकरण ठाणे जीआरपीकडे ट्रान्सफर करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, मार्च महिन्यात ही घटना घडली होती आणि त्या दिवसाचं लोकमान्य टिळक टर्मिनस येथील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. पोलिसांनी तुलसी एक्सप्रेस आणि त्याच वेळात लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना होणाऱ्या दोन रेल्वेतील तिकीट आरक्षणाची यादी तपासली आहे. या प्रकरणी मोबाईल फोन रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक माहिती गोळा करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!