Badlapur Rape Case : बदलापूर मधील शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
बदलापूर ( वास्तव पोस्ट ) : बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा अतिशय घृणास्पद प्रकार समोर आला आहे. सदरच्या प्रकारामुळे बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरचा अमानुष छळ करुन तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बदलापूरमधील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेत दोन अल्पवयीन लैंगिक मूली अत्याचारास बळी पडल्या. या दोन्ही मुली अवघ्या साडेतीन ते चार वर्षांच्या आहेत. त्यामुळे या घटनेबाबत बदलापुरकरांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
पिडित मुलींच्या पालकांना १२तास ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दि.२० रोजी बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्याप्रमाणे हजारोंच्या संख्येने पालक, राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आंदोलकांकडून शाळेच्या आवारात तसेच वर्गखोल्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

शाळेची तोडफोड करण्यामध्ये महिला आंदोलकही सहभागी आहेत. या बदलापूर बंदमध्ये रिक्षा चालक, व्यापारी संघटना, शाळा बस चालक देखील सहभागी झालेत. घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आहेत.

या सगळ्या प्रकारानंतर शाळेकडून एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. या प्रकारानंतर सबंधित आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना सहकार्य केले. या घटनेनंतर सबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे, असे शाळेने निवेदनात म्हटले आहे.
पूर्व प्राथमिक आणि शिशु वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या आणि सांभाळ करण्याच्या दृष्टीने फक्त महिलांचीच नेमणूक केली जाणार आहे. या प्रकरणात पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल संस्थेने त्यांची जाहीर माफी मागितली असून त्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व पालक, विद्यार्थी आणि शहरातील सजग नागरिकांना संस्थेने शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी संस्था तयार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी सांगितले आहे.
रेल्वे सेवा ६ तासांपासून विस्कळीत :

अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झाल्या आहेत. तर अंबरनाथवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्यादेखील पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहेत. अंबरनाथवरून कर्जत कडे जाणाऱ्या सर्व गाड्या बंद आहेत. बदलापूरमध्ये संतप्त आंदोलनात पुरुषांबरोबर महिलाही रेल्वे ट्रॅकवर उतरल्या आहेत.
त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रेल्वे पोलिसांचा मोठा फौजफाटा रेल्वे स्थानकात तैनात केला आहे. यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठिमार करण्यात आला. मात्र संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरवात केली. आंदोलक हातात फलक घेऊन घटनेचा निषेध, तसेच मोठमोठ्याने घोषणाबाजी करत आहेत. वी वॉन्ट जस्टीस… फाशी द्या… फाशी द्या आरोपीला फाशी द्या… अशी घोषणाबाजी संतप्त जमावाकडून होत आहे.
दरम्यान विरोधकांकडून देखील सदर प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया मिळत असुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडनविस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आरोपी हा हिस्ट्री शीटर असतांनादेखील त्याला संस्थेने नोकरीवर का ठेवले ? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच आरोपी हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून त्याला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जलदगती न्यायालयात खटला चाविण्याचे निर्देश दिले आहे.
