मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी मुंबई येथे जाऊन राजगृहावर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीसह पुण्यात जर वसंत मोरेंची एंट्री झाली तर भल्या भल्या प्रस्तापितांना पुणे लोकसभा जड जाणार एवढं मात्र नक्की. ही भेट लोकसभा २०२३ पुणे मतदार संघासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. वसंत मोरे यांनी त्यांना खासदार व्हायचे असल्याचे याआधीच घोषित केले होते. त्यामुळे या भेटीला खुप महत्व प्राप्त झाले असुन येत्या दोन दिवसात चित्र अधिक स्पस्ट होणार आहे.
दरम्यान वसंत मोरे म्हणाले की, मला पुण्याची निवडणुक एकतर्फी होऊ द्यायची नाही. म्हणून मी राजगृहावर साहेबांना भेटायला आलो. मी बऱ्याचदा मुंबईला आलो, पण पहिल्यांदा अस वाटतं की मुंबईला आलो आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला खुप वेळ दिला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला अशा वास्तूत वेळ मिळाला, ज्या वास्तूने या देशाचे संविधान लिहिले आहे.
मोरे पुढे म्हणाले की मला खासदार व्हायचे आहे, म्हणून मी आतापर्यंत जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांना भेटलो. सर्वांशी पुण्याच्या विकासावर चर्चा केली. परंतु ज्या लोकांकडे एक व्हिजन आहे तसेच आपल्या शहराचा खरोखर विकास झाला पाहीजे असे ज्यांना वाटते ते मला इथे राजगृहावर जाणवले. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पुणेकरांच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. हा पुण्यातला नव्हे तर देशातला पहिला प्रयोग असेल, आणि तो नक्कीच यशस्वी ठरेल. आणि माझे खासदारकीचे जे स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजगृह हा योग्य मार्ग असल्याचे वसंत मोरे म्हणाले.
तुम्ही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला का असा प्रश्न माध्यमांकडून आला असता वसंत मोरे म्हटले की सध्या मी चर्चेला आलो होतो आणि चर्चा ही सकारात्मक झाली आहे. यावर सविस्तर आंबेडकर साहेब बोलणार असुन पुढील दोन तीन दिवसात क़ाय तो निर्णय होईल.
