Home » राजकीय » अचूक नियोजनातून करण पाटलांना मिळणार वाढीव मताधिक्य; पाचोरा मेळाव्यात निर्धार

अचूक नियोजनातून करण पाटलांना मिळणार वाढीव मताधिक्य; पाचोरा मेळाव्यात निर्धार

पाचोरा | दि ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सत्ताधार्‍यांबाबत जनतेत रोष असून प्रचार फेर्‍यांमध्ये लोक आपल्या सोबत राहतील असे दिसून आले आहे. तथापि, मतदानाआधीच्या शेवटच्या टप्प्यात गाफील राहू नका असा आवाहन वजा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाचोर्‍यात आयोजीत मेळाव्यात दिला. तर, अचूक नियोजन करून करण पाटील यांना वाढीव मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार देखील याप्रसंगी करण्यात आला.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्यासाठी पाचोरा-भडगावातील महाविकास आघाडीच्या वतीने एकदिलाने प्रचार करण्यात आला. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी सर्व सहकार्‍यांसह मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांना जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

दरम्यान, आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाचोर्‍यातील समर्थ लॉन्स येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेना-उध्दव बाळासाहे ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितीन तावडे, विकास पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी माजी खासदार उन्मेष पाटील, वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, सचिन सोमवंशी, ऍड. अभय पाटील आदींसह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यात आजवर केलेल्या प्रचाराचा आढावा घेतांनाच मतदानासाठी योग्य नियोजन करण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. सध्या अतिशय कडक उन्हाळा असल्यामुळे दुपारच्या ऐवजी सकाळीच मतदारांना बुथवर घेऊन जाण्याच्या सूचना मान्यवरांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना दिल्या. अचूक नियोजन करून करण पाटील यांना वाढिव मताधिक्य देण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

या मेळाव्याला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, आम आदमी पक्ष आदी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!