ठाणे, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महाजनवाडी येथील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी (कॅशलेस काऊंटर) रुग्णालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी दिव्यांगांच्या उपचाराकरिता उभारलेल्या फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचेदेखील ई-अनावरण करण्यात आले. जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून मीरा-भाईंदर- वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयाला सुपुर्द करण्यात आली.

२१ जानेवारीच्या रात्री वेळीच योग्य दक्षता दाखवत कायदा आणि सुव्यवस्था राखल्याबद्दल पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांचा तर सजग राहून पत्रकारिता केल्याबद्दल मीरा भाईंदरमधील पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून मीरा भाईंदर मनपा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. आज इथे मेट्रो बनतेय, सूर्या धरणाचे पाणी आले, रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे तसेच आता क्लस्टर देखील प्रगतीपथावर असून ठाण्याप्रमाणेच येथेही क्लस्टर योजना राबवून घरांचा प्रश्न सोडवू असे मत याप्रसंगी व्यक्त केले. या भागात डीप क्लिन ड्राइव्ह प्रभावीपणे राबवावे, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे, सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल शाळा उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश पालिकेला दिले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार श्रीमती गीता जैन, आमदार पराग शहा, माजी आमदार रवींद्र फाटक, आयुक्त संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडेय आदी मान्यवर उपस्थित होते.
