डरबन ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने आफ्रिकेचा ६१ धावांनी धुव्वा उडवत चार समान्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ८ गडी बाद २०२ धावा केल्या, तर प्रत्युत्तरात यजमान दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ पूर्ण २० षटके देखील खेळू शकला नाही. २०३ धावांचा पाठलाग करतांना आफ्रिकेला १७.५ षटकात सर्वबाद १४१ धावाच करता आल्या.
टीम इंडियाच्या डावाचे आकर्षण ठरले ते संजू सॅमसनचे तूफानी शतक. संजू ने आफ्रीकन गोलंजांची यथेच्छ धुलाई करत केवळ चेंडूत ५० चेंडूत १०७ धावा ठोकल्या. त्यात ७ चौकार आणि तब्बल १० षटकारांचा समावेश होता. सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात शतक झळकावून त्याने इतिहास रचला. या सामन्याआधी त्याने बांग्लादेश सोबत शतक ठोकले होते.
भारताच्या डावात सलामीवीर अभिषेक शर्माला मोठी खेळी खेळता आली नाही. सूर्य कुमारने १७ चेंडूत २१ धावा केल्या. नंतर मात्र तिलक वर्मा सोडला तर इतरांनी फलंदाजीत घोर निराशा केली. हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, आणि अष्टपैलु अक्षर पटेल अपयशी ठरले. ३५ धावांच्या अंतरात भारताने ६ गडी गमावले. पण तिलक वर्माने १८ चेंडूत ३३ धावांची ताबडतोड खेळी करत भारताची धावसंख्या २०० च्या पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
घरच्या मैदानावर २०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. लागोपाठ दोन चौकार मारल्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्णधार एडन मार्कराम अवघ्या ८ धावा करून बाद झाला. अर्शदीपने एका अप्रतिम चेंडूवर त्याला विकेटकीपर संजू कडे झेल देण्यास भाग पाडले. यजमान संघाचे ४४ धावसंख्येपर्यंत तीनही आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते.
हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी ४२ धावांची भागीदारी केली, मात्र वरुण चक्रवर्तीने एकाच षटकात दोघांनाही बाद करून आफ्रिकन संघाला मोठा धक्का दिला. मधलीफळी देखील धावा करू शकली नाही मात्र तळाचा फलंदाज कोट्झी याने ११ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २३ धावां ठोकल्या मात्र त्यावेळी फक्त औपचारिकता बाकी होती. १३ षटकांत आफ्रिकेची अवस्था ७ गडी बाद ९३ अशी झाली होती.
भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी घातक गोलंदाजी करत प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर आवेश खान याने २ आणि अर्शदीप सिंगने १ विकेट घेतली. चार सामन्यांच्या मालिकेतील पुढील सामना १० नोव्हेबर रोजी सेंट जॉर्ज पार्क येथे खेळला जाणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळले जातील.