Headlines
Home » वाणिज्य » महायुती सरकारचा अंतरीम अर्थसंकल्प दिशाहीन व निराशाजनक : अमित विलासराव देशमुख

महायुती सरकारचा अंतरीम अर्थसंकल्प दिशाहीन व निराशाजनक : अमित विलासराव देशमुख

मुंबई | दि.२७ (वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यातील महायुती सरकारच्या वतीने आज मांडण्यात आलेला अंतरीम अर्थसंकल्प दिशाहीन आणि राज्यातील जनतेची निराशा करणारा आहे. पायाभूत सुविधा उभारणीला प्राधान्य देऊन हा अर्थसंकल्प जनहितकारी करण्याची संधी या सरकारला साधता आली नाही, अशी प्रतिक्रीया राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी आज राज्याचा अंतरीम अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, या अर्थसंकल्पात महापुरुषांच्या नावाने अनेक घोषणा केल्या आहेत, पण त्‍यासाठी ठोस तरतूद केली नाही. सरकारने राज्यातील प्रमुख घटक असलेले शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासाठी काहीच विशेष अशी तरतूद केली नाही. सरकारकडे पायाभुत सुवीधा वाढवून राज्याच्या विकासाची ठोस योजना दिसत नाही, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात केवळ घोषणाबाजी स्पष्टपणाने दिसून येत आहे.

कृषी, सिंचन, शिक्षण, आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी पुरेशी तरतूद या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशजनक आणि दिशाहीन असल्याचे जाणवत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक योजना राबवल्या गेल्या, ज्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली होती. राज्याचे विकासाची गती पुढे सुरू ठेवण्यासाठी या अर्थसंकल्पात शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी पुरेशी तरतूद करणे आवश्यक होते. राज्याचा विकास आणि लोकांचे कल्याण यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. पण या प्रमुख बाबीकडेच सरकारने दुर्लक्ष केल्याचे अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. अर्थसंकल्पापूर्वी मांडलेल्या पुरवणी मागण्या अर्थसंकल्पाचे बरोबरी करणारे आहेत, नव्याने मांडलेल्या या अर्थसंकल्पात कोणत्याच गोष्टीची पूर्तता होणार नाही हे स्पष्ट होत आहे, राज्यावर कर्जाचा बोजा वाढलेला असताना केलेल्या घोषणांची परिपूर्ती कशी होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे, पावसाळी अधिवेशनाचे दरम्यान जेव्हा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल त्यावेळेस हे सर्व प्रश्न उपस्थित केले जातील असेही आमदार देशमुख यांनी शेवटी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!