Home » महाराष्ट्र » ब्रेकिंग: राज्यातील शाळांची होणार पटपडताळणी; ‘या’ ३ दिवसांत होणार प्रत्यक्ष तपासणी

ब्रेकिंग: राज्यातील शाळांची होणार पटपडताळणी; ‘या’ ३ दिवसांत होणार प्रत्यक्ष तपासणी

पुणे l वास्तव पोस्ट वृत्तसेवा

राज्यातील शाळांमधील संचमान्यता आणि शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ३१ मार्च २०२६ रोजी निर्गमित केलेल्या सविस्तर पत्राद्वारे, राज्यातील शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी कधी आणि कशी होणार, याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पटपडताळणीच्या निश्चित तारखा

शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार, राज्यातील सर्व शाळांची पटपडताळणी दि. ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ या तीन दिवशी केली जाणार आहे. इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेतील त्यांची उपस्थितीच ग्राह्य धरली जाणार असल्याचे सदर पत्रकात म्हटले आहे.

इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थितीवरून केली जाईल. तर इयत्ता २ री ते ८ वी या वर्गांची पडताळणी ‘नियतकालिक मूल्यांकन चाचणी’ (PAT) च्या दिवशी (११, १५ आणि २२ एप्रिल) केली जाईल. इयत्ता १ ली आणि ९ वी च्या वर्गांची पटपडताळणी देखील वरील तीन तारखांनाच पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

पटपडताळणी सुरळीत पार पडावी यासाठी इयत्ता ९ वी आणि ११ वी च्या वार्षिक परीक्षांच्या वेळापत्रकातही बदल सुचवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती तपासता यावी म्हणून आता या परीक्षा दि. ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

डिजिटल पद्धतीने होणार नोंदणी

यावेळेसची पटपडताळणी पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असेल. यासाठी ‘स्टुडंट पोर्टल’वर HM Login, Cluster Head Login, BEO Login आणि EO Login अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शाळांना भेट देणारे पथक या लॉगिनचा वापर करून हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची रिअल-टाइम नोंद करणार आहे.

कोणाकडे असणार जबाबदारी?

ही मोहीम राबवण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांची विशेष पथके नेमली जाणार आहेत. यात केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी, ‘डाएट’ (DIET) मधील अधिव्याख्याता, शिक्षण विभागातील लेखाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांचा समावेश असेल. या सर्व अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष शाळा भेटीसाठी नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या मोहिमेमुळे राज्यातील शाळांमधील बोगस पटसंख्येला आळा बसणार असून, केवळ प्रत्यक्ष हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आधारावरच पुढील शैक्षणिक सत्राची संचमान्यता ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!