Home » राष्ट्रीय » खासदारांच्या वेतन, पेंशन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ जाहीर !

खासदारांच्या वेतन, पेंशन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ जाहीर !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना आता अधिक आर्थिक लाभ मिळणार असून, माजी खासदारांचे पेन्शनही वाढवण्यात आले आहे. ही वेतनवाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू असल्याने खासदारांना आणि माजी खासदारांना थकबाकीसह वाढीव रक्कम मिळणार आहे. याबाबतची अधिसूचना २४ मार्च २०२५ रोजी जारी करण्यात आली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे.

खासदारांचे मासिक वेतन आतापर्यंत १ लाख रुपये होते, जे आता २४ टक्क्यांनी वाढवून १ लाख २४ हजार रुपये करण्यात आले आहे. याशिवाय, संसदेच्या अधिवेशनादरम्यान उपस्थित राहण्यासाठी मिळणारा दैनिक भत्ता २,००० रुपयांवरून २,५०० रुपये करण्यात आला आहे. हा बदल खासदारांना त्यांच्या कामकाजात अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केल्याचे सरकारने म्हटले आहे.

माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही वाढ

या निर्णयाचा लाभ माजी खासदारांनाही होणार आहे. माजी खासदारांना मिळणारे मासिक पेन्शन २५,००० रुपयांवरून ३१,००० रुपये करण्यात आले आहे. ज्या माजी खासदारांनी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावली आहे, त्यांना मिळणारे अतिरिक्त पेन्शनही २,००० रुपयांवरून २,५०० रुपये प्रति महिना करण्यात आले आहे.

खासदारांच्या इतर सुविधा आणि भत्त्यातही वाढ

खासदारांना वेतन आणि पेन्शन व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या सुविधा आणि भत्ते मिळतात. यामध्ये मतदारसंघ भत्ता म्हणून दरमहा ७०,००० रुपये आणि कार्यालयीन खर्चासाठी ६०,००० रुपये देण्यात येतात. तसेच, प्रवास भत्ता, मोफत इंटरनेट आणि फोन सेवा यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. या सर्व भत्त्यांमध्येही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे खासदारांचे एकूण उत्पन्न आणखी वाढणार आहे.

यापूर्वी २०१८ मध्ये खासदारांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली होती, तेव्हा मूळ वेतन १ लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता २०२३ पासून ही वाढ करण्यात आल्याने सामान्य जनतेमध्ये आणि राजकीय वर्तुळात निर्णयाने चर्चेला उधाण आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!