मुंबई | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे कंगना सध्या जोरदार प्रचारात व्यस्त आहे. या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंगणाने अनेक विषयावर भाष्य केले. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणाला विचारण्यात आले की, ती चित्रपट आणि राजकारण दोन्ही कसे सांभाळणार ? यावर अभिनेत्री कंगणा म्हणाली, ‘मी चित्रपटात अभिनयही करते, भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते. “यंदाच्या निवडणुकीत मला यश मिळाले आणि जर लोक माझ्याशी आणखी मोठ्या प्रमाणात जोडले गेले तर मी अभिनय क्षेत्र सोडू शकते” अशी मोठी घोषणा कंगणाने यावेळी केली.
कंगणा पुढे म्हणाली की “जर मला वाटले की लोकांना माझी गरज आहे तर मी त्या दिशेने जाईन. मंडीतून जिंकले तरच राजकारण करेन. अनेक चित्रपट निर्माते मला राजकारणात जाऊ नका असे सांगतात. पण जर आता मला लोकांशी जुळण्याची संधी मिळाली तर मी ती देखील स्वीकारेन. मला वाटतं, लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याबद्दल तुम्ही आधी न्याय केला पाहिजे.” असे कंगणा यावेळी म्हणाली.
राजकारण आणि चित्रपट जगतात काय फरक सांगताना कंगना म्हणाली- “चित्रपट हे एक खोटं जग आहे. त्यातून वेगळे वातावरण तयार होते. चित्रपटाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी एक बबल तयार केला जातो. पण राजकारण हे वास्तव आहे. मला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, मी राजकारणात नवीन आहे, त्यामुळे मला खूप काही शिकण्यासारखे आहे.”
