मुंबई, दि.२१( वास्तव पोस्ट न्यूज) – जुन्या पिढीतील तरुणाईला वेड लावणाऱ्या रेडियोच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार म्हणून मनोरंजन विश्वावर आपल्या जादुई आवाजाची मोहिनी कायम राखणारे प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांच्या दुःखद निधनाने मनोरंजन युगाच्या एका पर्वाचा अस्त झाला आहे. ते ९१ वर्षांचे होते .रेडिओ सिलोनवर विक्रमी लोकप्रिय ठरलेली बिनाका गीतमाला, अमीन सयानी आणि रसिक तरुणाई हे त्यांच्या काळातील एक अतूट समीकरण होते.
सविस्तर वृत्त असे की २० फेब्रुवारी २०२४ रोजी अमीन सयानी यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबई येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल आकाशवाणीने शोक व्यक्त केला आहे. त्यांना श्रद्धांजली वाहताना ऑल इंडिया रेडिओने म्हटले आहे की, “सर्वात तेजस्वी सादरकर्त्यांपैकी एक, अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. ते बिनाका गीतमाला या रेडिओ शोचे प्रतिष्ठित सादरकर्ते होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”
आजही ते सर्वात जास्त अनुकरण केल्या जाणाऱ्या उद्घोषकांपैकी एक आहेत. पारंपारिक “भाइयों और बहनो” च्या विरुद्ध “बेहनो और भाइयों” म्हणजे “बहिणी आणि भावांनो” ने जमावाला संबोधित करण्याची त्यांची शैली त्याकाळात मोठी प्रसिद्धीस आली होती. त्यांनी १९५१ पासून ५४,००० हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि १९,००० स्पॉट्स/जिंगल्सची निर्मिती केली आहे. २००९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय अमीन सयानी हे अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत.
