जामनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील पाळधी येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात व्याख्याते, योग आणि अध्यात्माचे गाढे अभ्यासक, कवी, तथा लेखक जिवन महाजन यांचे “गुरुमंत्र यशस्वी जीवनाचे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. या सहशालेय उपक्रमाचे आयोजन उपक्रमाचे समन्वयक उपशिक्षक संतोष भारंबे यांच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक एस.एन. पाटील, पर्यवेक्षक बी.एन. जोशी, नाना सुशिर, बाविस्कर हे उपस्थित होते. व्याख्यात्यांचा परिचय करून देत असतांना रवींद्र खोडपे यांनी विद्यार्थ्यांना परिचय करून दिला की, जिवन महाजन हे अनेक पदांवर कार्यरत असून अनेक समाज उपयोगी विद्यार्थ्यांचे प्रबोधन हे मानधनासाठी करत नसून प्रबोधनासाठी गोर-गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य घडण्यासाठी करतात.
काही लोक त्यांना जे काही मानधन देऊ करतात त्या मानधनाचा उपयोग सुद्धा ते विद्यार्थ्यांचे गणित, विज्ञांचे किट विकत घेण्यासाठी करतात. त्याच गणित विज्ञानाच्या किट च्या माध्यमातून शाळांमध्ये कार्यशाळा आयोजित करून ते विद्यार्थ्यांना मोफत गणित विज्ञान शिकवत असतात, म्हणजेच मिळालेले मानधन सुद्धा विद्यार्थ्यांसाठी खर्च करत असतात हे प्रेरणादायी आहे.
जीवन यशस्वी बनविण्यासाठी अनेक गुरुमंत्र देत असताना जीवनात योग, प्राणायाम, ध्यान, वेळेचे व्यवस्थापन, कष्ट आणि संघर्ष करण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी, अथक आणि निरंतर प्रयत्नातूनच यश साध्य करता येऊ शकते, अपयशातून खचून न जाता शिकणे, कठीण विषयाला सोपे करून कसे शिकता येऊ शकते, जीवनातील आई- वडील आणि आध्यात्मिक गुरूचे महत्त्व, सुयोग्य मित्रांची निवड, मोबाईलचा सुयोग्य वापर अशा मुद्द्यांना समजावून सांगत असताना
अर्जुन आणि द्रोणाचार्य, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, थॉमस एडिसन, मीरा बाबर असे पुराण, इतिहास आणि आधुनिक काळातील उदाहरणे आणि दाखले देत तसेच प्रेरणादायी कथा सांगून आपल्या कुटुंबासाठी, शेजाऱ्यांसाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी महान कार्य करण्यासाठी प्रेरित केले. संघर्ष करून, कष्ट करून, उपाशी राहून अनेक सुविधा आणि साधने नसतांना महान लोक घडलीत तर आपल्याला सर्व सुविधा आहेत. आपल्या हातून त्यांच्यापेक्षाही महान कार्य घडले पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा आपली परिस्थिती नक्कीच चांगली आहे.
चलो मिलके अपने इस सुंदर देश के लिये कुछ ऐसा सुंदर करते है !!
जिससे हमारे देश का नाम पूरी दुनिया में रोशन हो जाये!!
असा संकल्प करून कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले.
यावेळी आपल्या कवित्व शैलीत बाविस्कर गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रवींद्र खोडपे यांनी केले, तर आभार बी.एन.जोशी यांनी मानले.