मुंबई | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये एकाचवेळी सर्वाधिक १७ वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने दखल घेतली असून याबाबतचे प्रमाणपत्रही त्यांनी वितरित केले आहे. याबद्दल अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पेनेतून सुरु झालेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाची नुकतीच सांगता झाली. २६ जानेवारी २०२४ पासून मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी पारंपरिक देशी खेळांची स्पर्धा आयोजित केली गेली होती. मल्लखांब, मल्लयुद्ध,लेझीम, लंगडी, रस्सीखेच, कबड्डी, पंजा लढवणे, रस्सीखेच आणि ढोल ताशा या क्रीडा आणि कला प्रकारांचे अंतिम सामने मालवणी येथील ‘क्रीडा भारती मैदान’ येथे झाले आणि पुरस्कार वितरणासह स्पर्धेचा समारोप झाला.
यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, मुंबईत प्रथम पारंपरिक क्रीडा स्पर्धा महाकुंभ यशस्वीरित्या पूर्ण झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ आयोजित केले होते.या स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली असून याबाबत त्यांनी प्रमाणपत्र ही वितरण केले आहे.
देशी खेळांच्या माध्यमातून शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेली तरुण पिढी घडवण्यास हातभार लावूया, देशाचे भविष्य घडविण्याची ताकद असलेले तरुण घडवण्यासाठी मदत होईल, असे श्री.लोढा यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी क्रीडा भारती’चे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांसह सर्वांचे सहकार्य मिळाले.
