जळगाव, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शहरातील जळगाव जिल्हा धोबी समाज सेवा मंडळ व समाजातील विविध समाज संस्था सर्वसमावेशक यांच्यावतीने दि.२३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी समाज शिरोमणी, स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत संत गाडगेबाबा जयंती उत्सव विविध कार्यक्रमद्वारे साजरा करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागातून शोभा यात्रा संत गाडगेबाबा उद्यानात येतील तेथून मुख्य मिरवणुकीस सुरवात होईल. मिरवणुकीत संत गाडगेबाबा यांच्या विचारांचे दशसुत्रीचे, स्त्रीभ्रूणहत्या जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाव , जल वाचवा पृथ्वी वाचवा, शिक्षणाचे व पर्यावरणाचे महत्त्व याचे प्रबोधनात्मक चित्ररथ सहभागी असतील.
मिरवणूक संत गाडगेबाबा उद्यान येथून स्टेडियममार्गे श्री शिवाजी पुतळा चौक , नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा टॉकीज चौक, जुने कोर्ट मार्गे संत गाडगेबाबा उद्यान येथे मिरवणुकीचा समारोप होईल. त्यांनतर महाप्रसाद, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळातर्फे बाल आश्रम येथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन, सामान्य रुग्णालयात फळे वाटप, महाराष्ट्र राज्य धोबी (परिट) समाज सर्व भाषिक महासंघ व संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन,जळगाव यांचे तर्फे दुपारी ४ वाजता संत गाडगेबाबा चौकात संत गाडगेबाबा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण असे विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा उद्यानातील संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन सकाळी ९.३० वाजता होईल व मुख्य मिरवणुकीस सुरवात होईल तरी समाज बंधू भगिनी, खेळाडू व युवकांनी मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जळगाव जिल्हा परीट सेवा मंडळ अध्यक्ष अरुणभाऊ शिरसाळे यांनी केले आहे.
