जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या ‘सपने हुए सच’ या दुसऱ्या वर्षातील अनोख्या उपक्रमा अंतर्गत शहरातील श्रमिकांच्या रहिवासी परिसरातील पाच शाळांमधील १५ विद्यार्थ्यांना दिल्लीसह आग्रा, मथुरेची सहल घडली. दिल्लीतील जुने व नवे संसद भवन, राष्ट्रपती भवन, कुतुब मिनार, लोटस टेम्पल, इंडिया गेट, आग्रा येथील किल्ला आणि मथुरेतील मंदिर तसेच विविध ऐतिहासिक, धार्मिक स्थळांच्या दर्शनाने कष्टकरी घटकातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य खुलले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे मेहरूणमधील या. दे. पाटील माध्यमिक विद्यालय, सुप्रीम कॉलनीतील शारदा माध्यमिक विद्यालय, विद्युत कॉलनी जवळील शकुंतला माध्यमिक विद्यालय, विसनजी नगरातील गुळवे माध्यमिक विद्यालय आणि महाबळ परिसरामधील टोके माध्यमिक विद्यालय या शाळांमधील विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी या आगळ्या वेगळ्या सहलीचा आनंद लुटला.

या विद्यार्थ्यांनी राजधानी एक्स्प्रेसने प्रवास केला. देशाची राजधानी व अन्य शहरातील अविस्मरणीय अनुभवाने या गरीब विद्यार्थ्यांना कमी वयात आणि रोटरी परिवाराच्या सहवासाने जग, करिअर, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक, प्रेरणादायी दृष्टिकोन मिळाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांचे पालकही कृतज्ञता व्यक्त करतान भारावाले. याच सुखद प्रसंगाने रोटरी परिवाराला समाधान मिळाले.
या विद्यार्थ्यांसोबत रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचे अध्यक्ष ओमप्रकाश सिंग, माजी अध्यक्ष अजित महाजन, प्रोग्राम कमिटी चेअरमन लक्ष्मीकांत मणियार, प्रकल्प प्रमुख डॉ. वैजयंती पाध्ये, मनीषा खडके, माधुरी महाजन होते. संसद भवन, राष्ट्रपती भवन आदी ठिकाणच्या भेटीसाठी खासदार स्मिता वाघ यांचे सहकार्य लाभले. तर कायदे विषयक परवानगीचे कामकाज आर्यन मणियार यांनी केले. या उपक्रमासाठी क्लबच्या ४५ प्लस लेजेंड लीग बॉक्स क्रिकेट मॅचमधील निधी कामी आला. यासाठी राजीव बियाणी नीलेश झवर, धर्मेंद्र भय्या, लक्ष्मीकांत मणियार, अजित महाजन आदींनी परिश्रम घेतले आहे.
विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी व त्यांच्या स्वागताकरिता क्लबचे सचिव संजय तापडिया, माजी अध्यक्ष नितीन इंगळे, चारू इंगळे, डॉ.अशोक पाध्ये, डॉ.पंकज शहा, डॉ.दर्शना शहा, सुमित मुथा, डॉ.शीतल भोसले, स्पोर्ट्स कमिटी चेअरमन नीलेश झवर, राजीव बियाणी, बीना चौधरी, धर्मेंद्र भय्या आदी उपस्थित होते.
दरम्यान, या क्लबतर्फे या उपक्रमाचा लाभ गेल्या वर्षी देखील १५ विद्यार्थ्यांनी घेतला होता. यात त्यांनी गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी ला भेट दिली होती.
