Home » क्राईम » दोन सख्ख्या भावांचा धारदार हत्याराने खून ! तीन दिवसात तिसरा खून; पोलिसांसमोर मोठे आव्हान

दोन सख्ख्या भावांचा धारदार हत्याराने खून ! तीन दिवसात तिसरा खून; पोलिसांसमोर मोठे आव्हान

रत्नागिरी | दि.१( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील गोळप गावी पावस बायपास रोडलगत एका आमराईत रखवाली करणाऱ्या दोन नेपाळी सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी कामगार आंबे काढण्यासाठी बागेत गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. भक्त बहाद्दूर थापा (वय ६०), ललन बहाद्दूर थापा (वय ५५) (मूळ रा. नेपाळ, सध्या आंबा बाग, गोळप) असे खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की रत्नागिरी-पावस बायपास मार्गावर गोळप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुस्लीम मोहल्ला येथे मुदस्सर मुकादम यांची आंबा कलमांची बाग आहे. नेहमीप्रमाणे काल (दि.३०) रोजी सकाळी बागेत एक कामगार आला तेव्हा त्याला दोघे मृतावस्थेत आढळून आले. त्याने सदर घटनेची माहिती मालक मुदस्सर मुकादम यांना दिली. बागेत येऊन खात्री पटल्यावर मुकादम यांनी या घटनेची माहिती पूर्णगड पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पूर्णगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धायकर यांच्यासह श्वानपथक, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविले.

दरम्यान मध्यरात्री अज्ञाताने धारदार हत्याराने दोघांवर सपासप वार करून त्यांच्या डोक्यात दगड घालून मृतदेहाचा चेहरा छिन्नविच्छिन्न केला होता. घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेले दोन दगड आढळून आले. परंतु, वार करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार घटनास्थळी आढळू न आल्याने घटनास्थळाचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. पोलिसांना परिसरात काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. तर श्वान पथक देखील हत्या करणाऱ्यांचा माग काढण्यासाठी आंबा बागेच्या बाहेर न जाता परिसरातच घुटमळत रहिले. खुनांच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान दुसऱ्या एका प्रकरणात रत्नागिरी शहरात कबुतरांना दाणे टाकण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसची चावी देत नसल्याच्या रागातून वॉचमनचा लाकडी दांडका आणि दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.२७) रोजी रत्नागिरीतील जेल रोड ते गवळीवाडा जाणाऱ्या रस्त्यावर घडली होती. ही घटना ताजी असतांनाच या दोघांच्या खुनाच्या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहीले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!