Home » जळगाव » ‘अनुभूती’च्या सुरांनी भवरलाल जैन यांना स्वरांजली ;१० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

‘अनुभूती’च्या सुरांनी भवरलाल जैन यांना स्वरांजली ;१० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

वास्तव पोस्ट l जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक, श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भावरलाल जैन यांनी नेहमीच ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांना ‘दादाजीं’च्या मायेचे छत्र आणि प्रेम दिले. याच आत्मीयतेच्या धाग्यातून अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे ‘भक्ती संगीत संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, अनुराधा बेरा, विक्रांत जाधव, शुभदा नेवे, निरज शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. ‘भाऊंच्या उद्यानात’ पार पडलेल्या या हृदयस्पर्शी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस भक्तीगीते सादर करून भावरलाल जैन यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमाची सुरूवात पांडुरंग नामी लागलासी ध्यास… या भक्तीगीताने  झाली. देवा इंद्रायणी थांबला…, तुझ मे राम मुझ मे राम…मुझमे राम तुझमे राम सबमे राम समाये…, शोधिसी मानवा राउळी मंदिरी…, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…, माझे माहेर पंढरी… अशी एकापेक्षा एक सरस भक्तीगीते अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केली. या संगीत संध्येतून केवळ गायनच नव्हे, तर भावरलाल जैन यांच्या जीवनमूल्यांचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमात देशाविषयीचा ममत्वभाव, पर्यावरणाविषयीची जागरूकता आणि मानवतेच्या नात्याने परस्परांविषयी आदर व आपुलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. तसेच, सामाजिक बांधिलकीतून एका संवेदनशील समाज निर्मितीसाठीचे योगदान या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले. या स्वरमयी आदरांजलीने उपस्थितांचे मन जिंकून घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!