पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील हरेश्र्वर पिंपळगाव येथील काही तरुणांनी ज्येष्ठ नागरीकांसोबत वृक्षारोपण केले. सदर कार्यास हातभार म्हणून किशोर आप्पा यांनी वटवृक्षाची ११ रोपं दिली असुन यातील ९ रोपं ही बहुळेश्वर गणेश मित्र मंडळ यांनी गणपती मंदीर रस्त्याच्या कडेला लावली. तसेच यापुढे युवा पीढी व ज्येष्ठ नागरीक दोघेही सोबत येऊन पावसाळ्यात गावातही झाडे लावू असा संकल्प यावेळी करण्यात आला.
सध्याच्या युगामध्ये विकासाच्या नावाखाली सर्वदूर वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तसेच मोठ मोठी सिमेंटची जंगलं ही उभे राहत आहेत. त्यामुळे निसर्गाचा अर्थात पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. वैश्वीक तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल साधण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षरोपणच नव्हे तर वृक्ष संवर्धन करणे देखील गरजेचे झाले आहे.
या जेष्ठ नागरिकांचा आदर्श ठेवून ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेता आज प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावून ते किंवा इतर झाडे जोपासली तर नक्कीच वाढते कार्बन डाॅयऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन वातावरणातील ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल.
हाच दृष्टिकोन समोर ठेऊन हरेश्वर पिंपळगाव येथील तरुणाईने जेष्ठ नागरिकांना सोबत घेऊन अबालवृद्ध नागरिक पुढे सरसावून वृक्षारोपण करून वृक्षास सांभाळण्याचा त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प त्यांनी केला.
