Headlines
Home » शैक्षणिक » विद्यापीठाच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार ; नवीन शैक्षणिक धोरणानुसार ६०/४० गुणांची परीक्षा

विद्यापीठाच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार ; नवीन शैक्षणिक धोरणानुसार ६०/४० गुणांची परीक्षा

सोलापूर | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– विद्यापीठाच्या परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार ८० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर २० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतली जाते. मात्रा यामध्ये आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल होणार असुन त्यात आता विद्यापीठाकडून ६० गुणांची तर महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणात नवीन धोरण लागू होणार आहे. त्यानुसार पदवी चार वर्षांची तर पदव्युत्तर पदवी एक वर्षाची असणार आहे. तर परीक्षा पॅटर्न देखील बदलणार आहे. विद्यार्थ्यांच्या ४० गुणांची जबाबदारी महाविद्यालयांवर तर ६० गुणांची परीक्षा विद्यापीठ घेणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणात परीक्षेची सेमिस्टर पद्धत ही कायम ठेवण्यात आली आहे. महाविद्यालयांमध्ये असलेल्या विषयांचे ग्रुप तयार केले जाणार असुन त्यातुन आवडीच्या विषयांची निवड विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्षाची सुरवात होण्यापूर्वी नवीन शैक्षणिक धोरणाची विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना पूर्णपणे माहिती व्हावी म्हणून विद्यापीठाकडून महाविद्यालय स्तरावर २७ मेपासून कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील शंका निरसन केले जाऊन संभ्रम व प्रश्न दूर होतील .

अशी असणार वर्षनिहाय विषय निवडीची पद्धत :
विद्यार्थ्याला पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेताना नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता तीन विषय कंपल्सरी निवडावे लागतील. दुसऱ्या वर्षात गेल्यावर तीनपैकी एक विषय अनिवार्य असेल आणि उर्वरित दोनपैकी एक विषय त्याला ऑप्शनल म्हणून घेता येईल. तिसऱ्या वर्षात गेल्यावर मात्र, त्याला एकच विषय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करता येईल. पदवीच्या चौथ्या वर्षात त्याला ऑनर्स किंवा रिसर्च यातील एक पर्याय निवडून शिक्षण घ्यावे लागणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची होणार अंमलबजावणी :
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये केली जाणार असल्याचे डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र-कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!