जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा येथील एका युवकाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. एका बड्या कंपनीच्या पिझ्झा विक्रीसाठी फ्रेंचाइजी मिळविण्यापोटी तब्बल ११ लाख ५० रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरुन हरिष जैन या व्यक्तीवर सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील एका युवकाला पाचोऱ्यात पिझ्झा विक्रीची फ्रेंचाइजी देण्याबाबत हरिष जैन याने कॉल केला. त्यात फ्रेंचाइजी विषयी सगळी माहिती युवकाला समजावून सांगितली. युवकाकडून ऑनलाईन अर्ज देखील भरुन घेतला. त्याचप्रमाणे लागणारी कागदपत्रही मागविण्यात आले. ही सगळी प्रक्रिया करत असतांना जैन याने युवकाचा विश्वास संपादन केला. सर्व माहिती दिल्यानंतर हरीष जैन याने स्वतःचा बँक खाते क्रमांक देत त्या खात्यावर फ्रेंचाइजीसाठीची रक्कम जमा करण्यास सांगितली.
सदर युवकाने टप्प्या टप्प्याने २६ एप्रिल ते ५ मे या कालावधीत तब्बल ११ लाख ५० हजार ५०० रुपयांची रक्कम दिलेल्या खात्यावर जमा केली. त्यानंतर युवकाने हरीष यास कॉल केला असता यावेळी त्याचा नंबर स्विच ऑफ आला. वारंवार कॉल करूनही क्रमांक बंद येत होता. सतत तीन दिवसांपासून फोन बंद येत असल्याने हरीष सोबत संपर्क होत नव्हता. शेवटी युवकाला आपली मोठी फसवणूक झाली आहे हे लक्षात आले. त्यानंतर युवकाने काल सायबर पोलिसांकडे धाव घेत हरिष जैन नामक व्यक्तीविरुध्द तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करत आहेत.
