Home » आंतरराष्ट्रीय » T20 विश्वचषक 2026: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश!

T20 विश्वचषक 2026: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश!

वास्तव पोस्ट | कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने आपला विजयी रथ कायम राखत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात विजय मिळवत भारताने ‘सुपर-८’ फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाल्याने संघ दडपणाखाली होता. मात्र, इशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत केवळ ४० चेंडूत ७७ धावांची स्फोटक खेळी केली. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादव (३२ धावा) आणि तिलक वर्मा (२५ धावा) यांनी मोलाची साथ दिली. भारताने २० षटकांत ७ बाद १७५ धावांचा आव्हानात्मक डोंगर उभा केला.

पाकिस्तानी फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली

१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. भारतीय वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत पाकिस्तानला ठराविक अंतराने धक्के दिले. पाकिस्तानचा संपूर्ण संघ १८ षटकांत केवळ ११४ धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून उस्मान खानने सर्वाधिक ४४ धावा केल्या, पण इतर कोणत्याही फलंदाजाला भारतीय गोलंदाजीसमोर तग धरता आला नाही.

भारतीय गोलंदाजांची चमक

भारताच्या विजयात गोलंदाजांनी सिंहाचा वाटा उचलला, यात जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी तर वरूण चक्रवर्ती आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

गुणतालिकेत भारत अव्वल

या विजयासह भारताने ग्रुप ‘A’ मध्ये सलग तीन विजय मिळवत ६ गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा आपला विक्रम आता ८-१ असा सुधारला आहे.

“आम्ही ज्या पद्धतीने क्रिकेट खेळू इच्छित होतो, तसेच आज मैदानात करून दाखवले. इशानची खेळी निर्णायक ठरली आणि गोलंदाजांनी आपली योजना चोख पार पाडली.”सूर्यकुमार यादव (भारतीय कर्णधार)

भारताचा पुढील सामना आता बुधवारी अहमदाबाद येथे नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!