जळगाव दि .२७ ( प्रतिनिधी ) भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचा इतिहास व चळवळीचा मागोवा घेतला तर आपल्या देशाच्या डीएनए मध्येच संघटनेच्या पद्धतीनेच यश मिळते,हे रहस्य आहे.संघटन कार्याने रिच आणि स्पीच मिळते म्हणजे आपला प्रभाव दाखवण्याचा वाव असतो असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे आ.श्रीकांत भारतीय यांनी केले.
व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवशीय केडर बेस प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पहिल्या व्याख्यानाचे वक्ते म्हणून त्यांनी ‘संघटन बांधणी व चिरंतन विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले.संजीवन, संरचना,संगत,संपर्क, संवाद, समन्वय,संघर्ष,संख्या, समोहन आणि संतोष अशा दहा ‘स’चे महत्व त्यांनी यावेळी विषद केले.
व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय केडर बेस प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन येथील जैन हिल्स येथे करण्यात आले आहे. प्रारंभी कार्यक्रमाचे उदघाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाले.पहिल्या दिवशी सकाळच्या सत्राला आ.श्रीकांत भारतीय यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार व लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी ‘पत्रकारिता : संतुलन व समतोल’ व शिवरत्न शेटे यांनी ‘संघटनात्मक बांधणी आणि शिवरायांचे व्यवस्थापन’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे,प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल व अजित कुंकूलोळ,राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डिगंबर महाले, जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके,राज्य सरचिटणीस चेतन कात्रे,प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, ग्रामगौरवचे विवेक ठाकरे, साप्ताहिक सेलचे रवींद्र नवाल आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकारांनी समाजाचा कणा होऊनच काम करावे – विजय बाविस्कर
सध्या पत्रकारितेत संतुलन, समतोल, समन्वय आणि संवाद हरविल्याची खंत बोलून दाखवत काही पत्रकारांनी टोकाची व विखराची चालविलेली एकांगी भूमिका समाजाला घातक असल्याचे रोखठोक मत ज्येष्ठ पत्रकार व लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी मांडले.पत्रकारांनी समाजाच्या पाठीचा कणा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत व्हाईस ऑफ मीडियाने आक्रस्थ,नाहक ओरडणे किंवा अनाठायी आवाज न होता सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम चालू ठेवण्याचे संघटनेला आवाहन केले.यावेळी विजय बाविस्कर यांनी सद्याच्या व्हाट्स अँप विद्यापीठावर चालणाऱ्या पत्रकारिता व येऊन ठेपलेल्या आर्टिफिशल इंटलीजन्स बाबत चिंता व्यक्त करून उपस्थित पत्रकारांना सजकतेचा ईशारा दिला.
राष्ट्रीय संघटक म्हणून जबाबदारी
कार्यक्रमप्रसंगी विजय बाविस्कर यांना व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेसाठी राष्ट्रीय संघटक म्हणून कार्य करण्याचे आवाहन व जबाबदारीची घोषणा संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजय बाविस्कर यांचा नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
व्हाईस ऑफ मीडियाच्या ऐतिहासिक कामाचे अशोक जैन यांनी केले कौतुक
व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेने अल्पवधीत केलेले संघटन व उमटवलेली मोहर अत्यंत प्रभावी असून या संघटनेने उभे केलेले पारदर्शक काम म्हणजे ऐतिहासिकच असल्याचे गौरवोउद्गार उद्योगपती व जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले.संघटनेचे यापुढील राष्ट्रीय अधिवेशन जैन हिल्स येथेच व्हावे अशी आग्रही भूमिका सुद्धा त्यांनी मांडली.केडरबेस प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागील भूमिका संघटनेचे संस्थापक संदीप काळे यांनी आपल्या प्रस्ताविकातून मांडली.संघटनेच्या वाटचालीची उपस्थितांना माहिती देतांना व्हाईस ऑफ मीडियाच्या स्थापनेपासून मेहनत घेणाऱ्या सरदारांना नक्कीच कवच कुंडले मिळतील,असे स्पष्ट केले.