जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या भागातील पथदिवे बंद आहेत. ते तातडीने सुरु करण्याची मागणी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेवून केली. प्रेमनगर जवळील बजरंग बोगद्यापासून ते पिंप्राळा रस्त्यावरील पथदिवे बंद असून, या मार्गावर रात्री देखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तेथील बंद पथदिवे सुरु करण्यात यावे, अशी मागणी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केली आहे.
कुलभूषण पाटील यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. सदर निवेदनात प्रेमनगर जवळील बोगद्यापासून ते पिंप्राळा पर्यंतच्या या मुख्य रस्त्यावर दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. या रस्त्यावरील दिवे बंद असल्याने अंधार पसरलेला असतो. अंधारामुळे अनेकदा या रस्त्यावर अपघात तसेच वाहन चालकांत वादविवाद होत असतात. या रस्त्यावरील बंद पथदिव्यांबाबत मनपा विज विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या परंतु संबंधित कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी यांनी तेथील पथदिवे सुरु करण्याबाबत कार्यवाही केली नाही. तरी लवकरात लवकर त्या रस्त्यावरील पथदिवे सुरु करण्यात यावेत अशी मागणी माजी महापौर कुलभूषण पाटील यांनी निवेदनातून केली आहे.
