Headlines
Home » क्रीडा » हाता तोंडाशी आलेला सामना गमावत लंकेने मालिका ३-० ने गमावली ; सुपर ओव्हर मध्ये भारत विजयी

हाता तोंडाशी आलेला सामना गमावत लंकेने मालिका ३-० ने गमावली ; सुपर ओव्हर मध्ये भारत विजयी

T- 20 : IND VS SL : तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेला नमवत भारताने ३-० ने मालिका खिशात घातली. अंतिम षटकात सूर्यकुमारने ५ धावा देत २ गडी बाद केले. सूर्याच्या अफलातून गोलंदाजीने मैदानाबाहेर बसलेल्या श्रीलंकेचा विस्पोटक माजी फलंदाज जयसूर्याला देखील काही क्षण काय झाले ते उमजलेच नाही.

पल्लेकेले ( वास्तव पोस्ट न्यूज ) : तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आज ​​टी-20 वर्ल्ड चॅम्पियन भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवत वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला २० षटक़ात केवळ १३७ धावांवर रोखले. प्रत्यूत्तरात १३७ धावांचा पाठलाग करतांना मात्र सगळं काही सुरळीत असतांनाही लंकेची चांगलीच दमछाक झाली. १९ व्या षटकात रिंकू सिंगने २, तर सूर्यकुमार यादव यानेही २०व्या षटकात २ बळी घेत लंकेची धावसंख्या १३७ वर मर्यादित ठेवली,आणि हा सामना शेवटी बरोबरीत सुटून सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने ३ चेंडूत आपले दोनही गडी २ धावात गमावले. दोन्ही विकेट सुंदर याने घेतल्या. अशाप्रकारे भारताला केवळ तीन धावांचे लक्ष्य मिळाले ते सूर्यकुमार यादव याने पहिल्याच चेंडुवर चौकार खेचत पूर्ण करत टी-20 मालिका ३-० ने खिशात घातली.

दरम्यान हा सामना भारताच्या हातून अक्षरश: पूर्णपणे निसटला होता. लंका १५.२ षटकात १ बाद ११० अशा भक्कम स्थितित होती, आणि विजयासाठी ९ गडी हाताशी असतांना २८ चेंडूत केवळ २८ धावांची श्रीलंकेला गरज होती. मात्र टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आपल्या कुशल आणि चाणाक्ष नेतृत्वाने अशी काही कमाल केली की श्रीलंकेच्या हाताशी आलेला विजय हिरावून घेतला. पार्ट टाईम बॉलर रिंकू सिंग याला १९ व्या षटकात गोलंदाजीस बोलवले असता रिंकू ने मिळालेल्या संधीचे सोने करत तीन धावा देत २ गडी बाद करून सामन्यात अतिशय चुरस निर्माण केली.

२० व्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी ६ धावांची गरज होती, आणि सामन्यात ३ षटक़ात केवळ ११ धावा देत टीच्चून मारा करणाऱ्या मो. सिराजचे एक षटक अजूनही शिल्लक होते. आता सिराज अंतिम षटक़ात कशी गोलंदाजी करणार याबाबत सगळेच क्रिकेट प्रेमी बसल्याजागी वेगवेगळे भाकीत करत होते. मात्र अचानक सूर्यकुमार यादवने २० वे षटक टाकण्यासाठी सिराज ऐवजी चेंडू स्वतः कडे घेताच सर्व प्रेक्षकांच्या भुवया आश्चर्याने ऊंचावल्या. निर्णायक अंतिम षटकात सूर्याने २ गडी बाद करत केवळ पाच धावा दिल्या. आणि सामना बरोबरीत सुटला.

श्रीलंकेकडून कुसल परेराने ४६ धावांची खेळी केली. रमेश मेंडिस ३,कामिंदू मेंडिसने १, वानिंदू हसरंगा ३ धावा केल्या आणि कर्णधार चारिथ असालंका शून्यावर बाद झाला. कुसल मेंडिसने ४३ आणि पथुम निसांकाने २६ या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी केली. भारताकडून वाशिंगटन सुंदर, बिश्नोई, रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

त्याआधी प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यावर भारताने निर्धारित २० षटकात ९ गडी गमावून १३७ धावा केल्या. सलामीवीर शुभमन गिलने कठीण परिस्थितीत ३ चौकारासह ३७ चेंडूत ३९ धावांची खेळी केली, श्रीलंकेकडून महिष थेक्षानाने ३ आणि वानिंदू हसरंगाने २ गडी बाद केले. नवोदित चमिंडू विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो आणि रमीस मेंडिस यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात यशस्वी जैस्वाल १० धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर भारताच्या विकेट धडाधड पडू लागल्या. एकवेळ भारताची धावसंख्या ८.५ षटक़ात ५ बाद ४८ धावा अशी बिकट होती. कर्णधार सूर्यकुमार यादव ८, आणि रिंकू सिंग १ यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

संजू सॅमसन ने तर खातेही उघडले नाही. तर शिवम दुबेने १३ धावांचे योगदान दिले. अशा स्थितीत गिलने रियान परागच्या साथीने आघाडी घेत भारताला शतकाच्या पलीकडे नेले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ५४धावांची भागीदारी केली. गिल आणि पराग १६व्या षटकात हसरंगाचे बळी ठरले. परागने १८ चेंडूत एक चौकार, दोन षटकारासह २६ धावा केल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने रवी बिश्नोईसोबत आठव्या विकेटसाठी ३२ धावांची बहुमूल्य भागीदारी केली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. सुंदरने १८ चेंडूंत २चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २५ धावा केल्या. बिष्णोईने ८चेंडूत ८ धावांवर नाबाद राहिला.

तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. शुभमन गिल परतला. मागच्या सामन्यात मानेच्या दुखण्यामुळे तो खेळला नाही. खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांना या मालिकेत पहिल्यांदा संधी मिळाली. श्रीलंकेने एक बदल केला. दासून शनाकाच्या जागी चामिंडू विक्रमसिंघेचा समावेश करण्यात आला. चामिंडूचा हा आंतरराष्ट्रीय पदार्पण सामना आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिका ३-०ने अशी जिंकली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!