जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महसूल पंधरवाड्याचे औचित्य साधून अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.१ऑगस्ट ते ४ऑगस्ट दरम्यान भोगवटाधारक २ चे भोगवटाधारक १ मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर आयोजित केले आहे. या विशेष शिबीराचा ज्या भोगवटाधारकांचे प्रलंबित दावे आहेत, त्यांनी लाभ घ्यावा असे महसूल प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
हे शिबीर दि.१ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट या काळात असेल. या शिबीरात नागरिकांना आवश्यक दाखले, नाहरकत प्रमाणपत्र, अभिप्राय उपलब्ध करुन देणेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात वन विभाग जळगांव, यांचे सक्षम अधिकारी म्हणून उपवन संरक्षक अधिकारी, जळगांव हे असतील. ते भोगवटा २ चे भोगवटा १ मध्ये रूपांतर करण्यासाठी वन विभागाचा अभिप्राय सादर करतील. अशाच प्रकारचा अभिप्राय उपवन संरक्षक अधिकारी, यावल त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रासाठी देतील.
भुसंपादन विभागाचे समन्वय अधिकारी, भुसंपादन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव हे भोगवटा २ मधून १ रुपांतर करणेकामी मिळकतीचे भुसंपादन बाबत अभिप्राय सादर करतील. तर नगररचना विभागाचे,सहायक संचालक, नगररचना जळगांव हे भोगवटा २ मधून १ रुपांतर करण्याकामी त्या मिळकतीचा झोन दाखला निर्गत करतील. मुल्यांकन विभागाचे सह. जिल्हा निबंधक वर्ग-१, जळगांव हे भोगवटा २ मधून १ मध्ये रुपांतर करण्यासाठी मिळकतीचे झोन दाखल्यानुसार मुल्यांकन सादर करतील.
हे सर्व अधिकारी दि.१ ऑगस्ट २०२४ ते दि.४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अल्प बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे उपस्थित राहून आवश्यक ते दाखले, नाहरकत प्रमाणपत्र निर्गमित करतील. या शिबिराकरीता आवश्यक कर्मचारी यांची नियुक्ती आपाआपल्या स्तरावर करण्यात यावी असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
यासाठी नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांना दिलेल्या तारखेस आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहून जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिले आहेत.
