LOKSABHA ELECTION 2024 मध्ये महाविकास आघाडीची गाडी सुसाट सुटली आहे. एक्झिट पोल मध्ये दाखविण्यात आलेल्या निकालापेक्षा वेगळा निकाल दिसत असल्यामुळे शेअर मार्केटवर त्याचा मोठा परिणाम होऊन शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप झाला आहे.
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी सुरूवात झाली असुन NDA विरुद्ध INDIA यांच्यात अतिशय अटीतटीची लढत सुरू असतानाच शेअर मार्केटमध्ये मात्र मोठ्ठा भूकंप आला आहे. शेअर मार्केट उघडले तेव्हा दीड ते दोन हजार अंकांनी घसरण झाली होती. निकाल येण्याआधीच शेअर मार्केट मध्ये मोठी हालचाल होणार अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना होतीच. आता जसजशी मतमोजणी पुढे जात आहे, तसतसे मार्केट खाली येत आहे. यावेळी तब्बल ५६०० ते ६००० अंकांनी मोठी घसरण झाली आहे. त्यात लोअर सर्किट लागल्याने गुंतवणूकदारांच्या टेन्शनमध्ये अधिकच वाढ झाली आहे.
जाणकारांच्या मते शेअर बाजारात आतापर्यंतची ही रेकॉर्ड ब्रेक घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १७०० अंकांनी तर निफ्टी ५०० अंकांनी घसरला. पण नंतर ही घसरण आणखी वाढत जाऊन सेन्सेक्स ६००० अंकांनी घसरला. एक्झिट पोलमध्ये एनडीएने जबरदस्त बहुमताने भाजप जिंकून येईल अशी हवा भरली होती. मात्र सध्याची मतमोजणीची येणारी आकडेवारी बघता एक्झिट पोलपेक्षा प्रत्यक्षातला निकाल वेगळाच लागण्याची शंका आहे.
सध्याचे मतमोजणीदरम्यानचे आकडे पाहता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यावेळी महाविकास आघाडीची गाडी मात्र सुसाट सुटली आहे. याचाच मोठा परिणाम शेअर मार्केटवर पाहायला मिळत आहे.
आज सकाळी इंट्रा’डे ट्रेडमध्ये गुंतवणूकदारांची संपत्ती सुमारे २६ लाख कोटी रुपयांनी कमी झाली. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप मंगळवारी सकाळी सुमारे ४०० लाख कोटींवर घसरले, जे मागील सत्राच्या शेवटी सुमारे ४२६ लाख कोटी होते. सेन्सेक्स ५६२५ अंकांनी तर निफ्टी १७६९ अंकांनी घसरला आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा शेअर मार्केट पडतं… तेव्हा सत्ताबदलाचे संकेत असतात असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आता सत्ताबदल होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. आजच्या ह्या पडझडीमुळे बँक शेअर्सना मोठा धक्का बसला आहे.