जळगाव | दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. ४ मे, २०२४ रोजी एमआयडीसी भागातील के-१० सेक्टर मध्ये मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट कंपनीवर छापा मारीत शितपेयाच्या नावाखाली सुरु असलेला बनावट देशी दारुचा कारखाना उध्वस्त केला. या छापामारीत सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी ०५ आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.
जळगावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट मद्य निर्मिती कारखान्यावर छापा मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अवैध व बनावट दारु विक्री व निर्मितीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्यातूनच राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
सदर कारखान्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक डी. एम. चकोर यांच्या पथकास गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहीतीआधारे आज मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास MIDC भागातील के-१० सेक्टर मध्ये मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट कंपनीत छापा मारला. याठिकाणी शित पेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारु कारखाना सुरु असल्याचे आढळून आले. याठिकाणी बनावट मद्य निर्मिती करुन ते बाटलीत भरताना दिसले. या प्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४५ हजार सिलबंद मद्याच्या बाटल्या, देशी मद्याचे भरलेले बॅरल, १ लाख रिकाम्या बाटल्या, लेबल पट्टी मशिन, बुच सिल करण्याचे मशिन, पाणी शुद्धीकरण मशिन, चार चाकी वाहन यासह किरकोळ व इतर साहित्य असा सुमारे ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादक शुक्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, प्रसाद सुर्वे, उपआयुक्त उषा वर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शना खाली निरिक्षक डी. एम. चकोर, एस.बी. चव्हाणके, दुय्यम निरीक्षक एस.बी.भगत, सी. आर. शिंदे, राजेश सोनार, विठ्ठल बाविस्कर, गिरीष पाटील, सुरेश मोरे, पी.पी. तायडे, दिनेश पाटील, गोकुळ आहिरे, धनसिंग पावरा, एस.आर.माळी, विपुल राजपुत, आर.टी. सोनवणे, व्ही.डी. हटकर, एम.एम. मोहिते, आर.डी. जंजाळे, नंदू पवार यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास डी.एम. चकोर हे करत आहेत.
