Headlines
Home » जळगाव » बायोकेमिस्ट्री विभागात प्रश्नमंजुषा व वैज्ञानिक खजिना शोध स्पर्धा संपन्न

बायोकेमिस्ट्री विभागात प्रश्नमंजुषा व वैज्ञानिक खजिना शोध स्पर्धा संपन्न

वास्तव पोस्ट l जळगाव : मुळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथील बायोकेमिस्ट्री (जैवरसायनशास्त्र) विभागातर्फे दि.२८ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, आज दि.२७ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन तसेच आंतरराष्ट्रीय प्रोटीन दिन यांच्या औचित्याने प्रश्नमंजुषा स्पर्धेसोबतच वैज्ञानिक सूचनांवर आधारित शोधमोहीम (Scientific Treasure Hunt) या आगळ्या वेगळ्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, बायोकेमिस्ट्री विषयातील संकल्पना दृढ करणे तसेच प्रोटीनचे आरोग्य, पोषण आणि विविध जैविक प्रक्रियांमधील महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे हे होते. स्पर्धेमध्ये बी.एस्सी. बायोकेमिस्ट्री च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत मूलभूत बायोकेमिस्ट्री, प्रोटीनची रचना व कार्य, पोषणशास्त्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, विज्ञानातील महत्त्वपूर्ण शोध तसेच चालू घडामोडींशी संबंधित विविध फेऱ्यांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपले विषयज्ञान, तर्कशक्ती आणि स्पर्धात्मक वृत्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

यासोबतच आयोजित करण्यात आलेल्या वैज्ञानिक ट्रेझर हंट उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा व विज्ञानाशी संबंधित सूचनांवर आधारित विविध टप्पे पूर्ण करत अंतिम उद्दिष्ट गाठावे लागले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता, समस्या सोडविण्याची कौशल्ये, संघभावना आणि वैज्ञानिक विचारसरणी विकसित होण्यास मोठी मदत झाली. उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण केला. स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन बी.एस्सी. प्रथम वर्षातील विद्यार्थी राजेश प्रजापत, प्रथमेश पाटील, भुवनेश चौधरी, गौरी हलपतराव, अस्मिता तायडे आणि तृषा पाटील यांनी केले. कार्यक्रमाची अंमलबजावणी विभागप्रमुख डॉ. भूषण कविमंडन तसेच विभागातील प्राध्यापक डॉ. सुरेश कांबळे, डॉ. किशोर पाटील, डॉ. विपुल फालक फाळक आणि डॉ. उमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे करण्यात आली.

तसेच या कार्यक्रमासाठी डॉ. उमेश वाघ यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करत उल्लेखनीय योगदान दिले. यासोबतच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस.एन. भारंबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख व प्राध्यापकांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!