जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेल्या समस्यांविषयी ‘वास्तव पोस्ट‘ स्पॉटवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत असून लोकांकडून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याचा स्पॉट आहे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ते शासकीय आय.टी.आय. मुलींचे वस्तीगृह या दरम्यान महामार्गाची झालेली दुर्दशा.
आजच्या पाहणी दरम्यान महामार्गावरील काल खरडपट्टी करून काढलेले डांबर, खडी व कच (वेस्टेज मटेरियल) त्याच ठिकाणी महामार्गाच्या खचलेल्या भागात टाकण्यात आले होते, ते वाहतुकीच्या वर्दळीमुळे व थोड्याफार साफसफाईमुळे आज मात्र काहीसे कमी झालेले दिसून आले. त्यामुळे तेथे आता जणुकाही एक पाटचारीच निर्माण झाल्यागत दिसून आले. वाहतुकीमुळे खडीचे आकारमान कमी होऊन त्याचे रूपांतर आता मातीत झाले आहे.

परिणामी स्पॉटवर कालपेक्षा आज धुळीचे प्रमाण हे अधिक दिसून आले. कहर म्हणजे काही मजूर महामार्गावर पसरलेली, तसेच डिव्हायडररूपी कठड्याला लागून जमा झालेली माती उकरुन ती उचलून महामार्गावरच तसेच साईडपट्टीला कुठे खड्डा दिसेल त्यात टाकतांना दिसून आले.
त्याआधी महामार्गाच्या बाजुलाच असलेल्या एका चहाच्या छोट्याशा टपरिवर चहा घेत असतांना जळगावच्याच एका गृहस्थाने (वय ५२) आम्हाला आपली जास्त माहिती किंवा परिचय न देता प्रश्न उपस्थित केला की, या महामार्गाचे ठेकेदार कोण ? कामाची प्रत बघता नेमुन दिलेल्या अनुभवी ठेकेदाराकडूनच कामं केले जातात का ? प्रश्न ऐकुन मात्र …मजूरांकडून रस्त्यावर केली गेलेली धुळफेक बघून त्या गृहस्थाने केलेला ‘तो’ प्रश्न बरोबर तर नाही न… असा प्रतिप्रश्न आम्हालाच निर्माण झाला.
अशातच राज्यातल्या राजकारणातील आपल्या खान्देशची


वजनदार मुलुख मैदान तोफ पाळधीकडून शहराच्या दिशेने धडाडली. त्यांच्या सोबत असलेल्या पोलीस बंदोबस्तातील आणि इतर २/३ गाड्या धूळ तूडवत आणि उडवत एकामागोमाग सावकाश निघुन गेल्या. काहीतरी कामात असल्याने मंत्र्यांची नजर मात्र आपल्या हातातील मोबाईल वर असल्याचे काचेतुन दिसून आले, त्यामुळे रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेवर त्यांची नजर आज तरी काही पडली नाही.
आजही वास्तव पोस्ट ने काही नागरिकांचे मतं जाणून घेतली. तेव्हा प्रकर्षाने जाणवले की त्यांच्या मते महामार्गबाबतच्या समस्या या कायमस्वरूपी न सूटता त्या अशाच २/४ महिन्यात उद्भवत राहतील. तसेच पायी जाणारे ज्यांनी की जळगावचे अनेक पावसाळे बघितले आहेत असे लोकं उदास हास्य करत काहीही न बोलता नकारार्थी मान हलवत, तर काही आपल्या हाताचा पंजा मुरडत साईडपट्टी (नसलेल्या) वरुन चालत शहराच्या दिशेने जात होते.
वास्तव पोस्ट स्पॉटवर फोटो घेत असतांना मात्र मोबाईल रिल्सच्या जमान्यातली नवीन पीढी त्यातल्या आपल्या मम्मी पप्पांसोबत मोटारसायकलवर बसलेली बच्चे कंपनी हाताच्या बोटांनी ‘व्ही’ करून तसेच ‘थम’ व टाटा बाय बाय करतांना दिसले. वयाने लहान असलेल्या या बालकांना महामार्गाशी सध्यातरी काहीच घेणे देणे नाही. मात्र त्यांच्या पालकांनी लक्षात घ्यावे की, उद्या आपली ही चिमुकली पाखरं याच धुळीच्या रस्त्याने शाळा, कॉलेज मध्ये जाऊ नये असे वाटतं असेल, तर मोठ्या संख्येने एकत्र येत सबंधित विभागास हक्काने जाब विचारलाच पाहिजे.
(भाग ३)
