Headlines
Home » क्राईम » पोर्शे कार अपघात: आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक

पोर्शे कार अपघात: आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गेल्या रविवारी पुण्यात कल्याणी नगर येथे झालेल्या अपघात प्रकरणी आज पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात मद्यधुंद अवस्थेत आलीशान पोर्शे कार चालवून रस्त्यावरील दोघांना उडवले होते. यानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी ससुन रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, हे रिपोर्ट ससुन रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांनी बदलून त्यात फेरफार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना रविवारी रात्री अटक केल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयामधील डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात १९ मेच्या रात्री कल्याणीनगर भागात बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या आलीशान पोर्शे कारने २ आयटी इंजिनिअर तरुणांना पाठीमागून उडवले होते. यात दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यावर अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट हा ससुन रुग्णालयात पाठवण्यात आला होता. हा रिपोर्ट ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हरलोल या दोघांनी बदलल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

आरोपीच्या डीएनए टेस्टमुळे ससूनचे बिंग फुटले
डॉक्टर अजय तावरे आणि चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर श्रीहरी हरलोल यांच्या विभागात अप्लवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यावर ते बदलण्यात आले. दरम्यान, हे करण्यासाठी रजेवर असलेले डॉक्टर अजय तावरे यांनी आरोपीमुलाच्या रक्ताचे नमुने बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच एका रुग्णाचे रक्ताचे नमुने हे टेस्टिंगसाठी देण्यात आले. मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबला पाठवून डीएनए टेस्ट केल्याने ही प्रकरण पुढे आले.

दरम्यान या प्रकरणात बिल्डरच्या आरोपी अल्पवयीन मुलाला १४ दिवसांकरीता बाल कारागृहात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी मुलाचे वडील विशाल अग्रवाल व आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल आणि अपघात झाला त्यावेळी गाडीत असलेला ड्रायव्हर यांची एकत्र चौकशी होणार आहे. त्यांच्यावर चालकाला गुन्हा त्याच्यावर घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!