पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणी आज एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवाल या दोघांना ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि वडील विशाल अगरवाल यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांना ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासाकामी पोलीस कोठडीची मागणी : आज न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील यांनी दोन्ही आरोपीची ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. तसेच कार चालकाचा फोन हस्तगत करायचा असुन त्याचा पुढचा तपास करायचा आहे. या सगळ्यांचा एकत्रित तपास करावयाचा असल्याने पोलीस कोठडी हवी आहे. तसेच या दोघांना आणखी कोणी मदत केली आहे का ? याचा देखील तपास करावयाचा आहे.
दरम्यान सीसीटीव्हीमध्ये झालेल्या छेडछाडीबाबत अधिक तपास सुरु असुन त्यात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कोणी केला या दिशेने तपास करावयाचा आहे. म्हणून पोलीस कोठडी देण्यात यावी असे यावेळी न्यायालयात पोलिसांनी सांगितले.
