Headlines
Home » जळगाव » कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण वाढवणार : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण पुढील दहा वर्षात ५० टक्क्यांपर्यत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धेारणाच्या माध्यमातून हा निर्धार पूर्ण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ वा दीक्षान्त समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा.एम.जगदीश कुमार, कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे ग्रामीण व आदिवासी भागात असूनही उत्तम प्रतीचे उच्च शिक्षण देत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यापीठातील चार वर्षीय ऑनर्स डिग्री प्रोग्रॉम, ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॉम तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी काही पुस्तकांचे मराठीत केलेले भाषांतर, विद्यापीठातील इनोव्हेशन – इन्क्युबेशन केंद्रामार्फत स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे कौतुक केले.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या वर्गाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न असून आर्थिक कारणांमुळे शिक्षणात बाधा येवू नये यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समानता तसेच सांस्कृतिक वारसा याबद्दल मांडलेल्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून हे शैक्षणिक धोरण राबविले जात आहे. असे पदवीधरांना उद्देशून त्यांनी केले.

मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्रा.म.सु. पगारे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा शिवाजी पाटील, प्रा सुरेखा पालवे, ॲड.अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ. कपील सिंघेल, सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.

या समारंभात दहा विद्यार्थ्यांना राज्यपाल तथा कुलपती यांच्या हस्ते सुवर्णपदक देण्यात आलेत. त्यानंतर कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी व प्रा. जगदीश कुमार यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांनी घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रफिक शेख व डॉ. विना महाजन यांनी केले.

मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

दीक्षांत समारंभ सुरु होण्यापूर्वी सकाळी विद्यापीठात रुसा निधी अंतर्गत नव्याने बांधकाम केलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.

यावेळी कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी, प्रा.एम. जगदीश कुमार यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच विद्यापीठ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील आणि मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठास रुसा अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून २११ विद्यार्थिनी क्षमता असलेल्या मुलींच्या वसतिगृह क्र.४ चे बांधकाम करण्यात आले आहे. या वसतिगृहाच्या बांधकामाकरीता ८ कोटी ३१ लाख रुपये खर्च झाला असून रुसा अंतर्गत ५ कोटी ७० लाख रुपये निधी प्राप्त झाला तर उर्वरित रक्कम विद्यापीठाच्या सर्वसाधारण निधीतून खर्च करण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!