जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नटवर कॉम्पलेक्स PVR सिनेमागृह शेजारी भरारी सभागृह जळगांव येथे दिनांक १२ मार्च ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीत तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी दिली. तमाशा प्रशिक्षण शिबिराचे शिबिर संचालक म्हणून श्री शेषराव गोपाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तमाशा प्रशिक्षणासाठी स्थानिक तसेच बाहेरगावातील विद्यार्थ्यांना सलग २० दिवस तमाशाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तमाशा प्रशिक्षण देण्यासाठी तमाशा क्षेत्रातील नामवंत व दिग्गज तमाशा कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यावर्षीचे तमाशा प्रशिक्षण शिबिर शिबीर संचालक श्री शेषराव गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नटवर कॉम्पलेक्स PVR सिनेमागृह शेजारी भरारी सभागृह जळगांव या ठिकाणी दिनांक १२ मार्च ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिराचे उद्घाटन मंगळवार दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मा. सदस्य, लोकसभा श्री. उमेश पाटील व मा. सदस्य, विधानसभा श्री. राजु मामा भोळे व योगेश पाटील सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्या शुभहस्ते होणार आहे. उद्घाटन प्रसंगी लोकप्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी समारोपीय कार्यक्रमात तमाशा प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमार्फत विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे मा. मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तमाशा प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा दिल्या असून भविष्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.