मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा महाबॅंक प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री बनसोडे, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदी उपस्थित होते.
कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बॅंक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
कांद्यावर अणुऊर्जेच्या माध्यमातून विकिरण प्रक्रिया करून त्याची साठवणूक करता येईल. कांदा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून या संकल्पनेची प्रत्यक्ष सुरूवात राहुरी जि.अहमदनगर येथे हिंदुस्थान अग्रो संस्थेच्या माध्यमातून होत आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.