जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता अनंत चुंबळे यांची ३० लाख रुपयांसाठी त्यांचाच सहकारी तथा कर्मचारी संघटनेचा नेता जिजाबराव पाटील व त्याचा साथीदार अशा दोघांनी मिळून दि.२० ऑगस्ट रोजी निर्घृण हत्या करून मृतदेह शिरपुर जवळील पुलावरुन तापी नदीत फेकून दिला.
दरम्यान या भीषण घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी आणि निवृत्त परिचारिका चुंबळे यांच्या मृतदेहाचा लवकरात लवकर शोध लागावा तसेच भविष्यात अशा दुःखद घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व संघटना, समन्वय समिती जळगाव यांच्यावतीने आज दि.९ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव पर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, प्रभारी निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, स्नेहलता अनंत चुंबळे यांच्या हत्ते प्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात यावा आणि दोघांना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागात महिला तक्रार निवारण समिती स्थापन व्हावी, आरोपींच्या संपत्तीची सखोल चौकशी करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
आजच्या या मूक मोर्च्यात अधिकारी व नियमित तसेच सर्व कंत्राटी आरोग्य कर्मचारी महिला व पुरुष, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटना, राज्य बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, बहुजन कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद मागासवर्गीय व इतर मागास वर्गीय संघटना हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना, फार्मसी ऑफिसर असोसिएशन यांचा पाठिंबा लाभला होता.