भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. हे धोरण २०२० मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा परिष्कृत आवृत्ती असून, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले.
शहरातील पुंडलिक गणपत बऱ्हाटे विद्यालयामध्ये शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 चा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. या प्रशिक्षणाला जिल्हा समन्वयक तथा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. सी.डी. साळुंखे डॉ. कविता चव्हाण उपस्थित होत्या.

या प्रशिक्षणात बोलताना प्राचार्य झोपे म्हणाले की, असर चा आलेला रिपोर्ट हा आपल्यासाठी अतिशय काळजी करणारा विषय असून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती भर दिला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमता यामध्ये वाचन, लेखन व गणन या क्रिया प्रत्येकामध्ये वृद्धिंगत झाल्या पाहिजेत. पायाभूत चाचणी व असर यामधील तफावत ही विचार करण्यासारखी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलणारा विद्यार्थी तयार करावयाचा असल्याने सर्वांनी तयार राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉक्टर सी.डी. साळुंखे म्हणाले की तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, बहुभाषिक शिक्षण, शिक्षण व संशोधनाचा समन्वय, गुणवत्तापूर्ण शिक्षक प्रशिक्षण, समावेशक शिक्षण यांचा समावेश करण्यात आला असून या धोरणामुळे भारतीय शिक्षण प्रणाली अधिक नाविन्यपूर्ण, व्यावसायिक कौशल्ययुक्त आणि विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचणारी बनेल. शिक्षण क्षेत्रातील ही सुधारणा विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवेल आणि देशाच्या एकूण विकासाला गती देईल, असे तज्ज्ञांचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक तायडे यांनी तर आभार निलेश पाटील यांनी मानले.
