वास्तव पोस्ट l जळगाव : जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये ४ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा होत आहे. ही परिषदेची ५५ वी राष्ट्रीय सुरक्षा दिन मोहिम आहे. या वर्षी ही मोहिम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता संपूर्ण आठवडाभर होणार आहे. २०२६ हे वर्ष परिषदेच्या स्थापनेचे हिरकजयंतीचे वर्ष आहे. सहा दशकांचा प्रवास, सहा दशकांची साधना आणि सहा दशकांची सुरक्षा संस्कृती कॉर्पोरेट जगतात विकसीत झालेली आहे.
‘तीन ई’ म्हणजे Engage, Educate आणि Empower यांचा संगम प्रत्येक सहकाऱ्याला सुरक्षिततेबाबत जागरूक, प्रशिक्षित आणि सक्षम बनवतो. त्यामुळे यावर्षाचे घोषवाक्य “Engage, Educate & Empower People to Enhance Safety” हे आहे. यात लोकांचा सहभाग, सातत्यपूर्ण शिक्षण आणि सक्षमीकरण यावर भर देत ही मोहिम समाजात सुरक्षा संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करणार आहे. सहकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सहभागी करणे (Engage), आवश्यक ज्ञान व कौशल्ये देणे (Educate) आणि निर्णय घेण्याची ताकद व जबाबदारी देणे (Empower) यामुळे कार्यस्थळी सुरक्षिततेची भक्कम पायाभरणी होते. कंपनीसाठी सुरक्षितता ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून प्रत्येक सहकाऱ्याच्या आरोग्य, आत्मविश्वास आणि सहकार्याला जपणारी गोष्ट आहे.
जैन इरिगेशनसारख्या संस्थेत हा कार्यक्रम होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण ही संस्था केवळ उद्योगक्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनाशी, ग्रामीण विकासाशी आणि पर्यावरणाशी निगडित आहे. अशा ठिकाणी सुरक्षा मोहिमेचा प्रारंभ होणे म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकाला सुरक्षिततेचा संदेश पोहोचवणे होय. जैन इरिगेशनच्या सर्व प्रकल्पांच्या प्रांगणात जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या कार्यकाळापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आता कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन व जैन विस्तारीत परिवाराच्या सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असतो. हिरक जयंती वर्षातला हा सुरक्षा संकल्प म्हणजेच समाजाच्या प्रगतीचा संकल्प घेत सुरक्षेची शपथ यावेळी देण्यात आली.
कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शनात डॉ. जनमेजय नेमाडे, सी.एस. नाईक आणि जे.एस. जैन यांच्या सहकार्याने प्लास्टिक पार्क येथील प्रशासकीय इमारत समोरील लॉनमध्ये कार्यक्रम घेतला गेला. त्यात डॉ. योगेश बाफना व शुभम शुक्ला यांनी उपस्थितांना सुरक्षेबाबत शपथ दिली व मार्गदर्शन केले. तसेच जैन फूडपार्क, एनर्जी पार्क आणि ॲग्रीपार्क येथे वरिष्ठ अधिकारी सुनील गुप्ता, कैलास सैंदाणे, दिलीप वाघ, निखील भोळे व फायर सेफ्टी विभागातील सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी पणे संपन्न झाला.

