जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : यंदा जून महिन्यापासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरात आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. परंतु, पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात होणारे बदल, रोगट हवामान, मंदावलेली पचनशक्ती, डासांच्या उत्पत्तीत झालेली वाढ यामुळे अनेक साथीचे आजार बळावतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
◆ 🦟 डास होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी :
डबके, टायर, प्लास्टिक चे साहित्य, नारळ इत्यादी पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले आहे.
एडीस एजिप्ती डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटीमध्ये प्रत्येक गावात घरांना भेटी देऊन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांच्या माध्यमातून केले जात आहे. प्रत्येक घरातील वापरण्यासाठी भरण्यात येणारे पाणी साठे तपासले जाणार आहेत. पाणीसाठ्यात डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्यास ती भांडी रिकामी करावी लागतात. रिकामे करता न येणाऱ्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉस किंवा ॲबेटचे द्रावण टाकले जात आहे.
डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्रावी ताप, डेंग्यू शॉक सिंड्रोम अशा तीन प्रकारे होऊ शकते. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, यामुळे मृत्यू ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप असतो. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, चव आणि भूक न लागणे, मळमळणे, उलट्या, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते.
◆ अशी घ्या काळजी :
- आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा.
- घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा.
- पाण्याचे टॅंक तथा बॅरेल स्वच्छ ठेवा, टॅंक उघडे ठेवू नका.
- सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
- झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका. त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा.
- घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे.
- गप्पी मासे साचलेल्या पाण्यात सोडा.