मुंबई | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होत असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्क मैदानावरील गुढीपाडवा मेळाव्यातून केली असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे म्हणाले की, मला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज करणार नाही. हे इंजिन चिन्ह कार्यकर्त्यांच्या कष्ठाने कमावलेलं आहे, त्यावरच लढणार.
दरम्यान मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज पार पडला. दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उत्सूकता शिगेला पोहोचली होती. या भेटीनंतर मनसे महायुती मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आज अखेर राज ठाकरेंनी त्या सर्व चर्चांवर सविस्तर भाष्य केलं आहे. राज ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, आपल्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन देखील केले.
राज ठाकरे म्हणाले की, देशाला आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या युतीला नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे मला भेटले होते. त्यांना मी सांगितले की, जागावाटपाच्या भानगडीत मला पाडू नका. मला राज्यसभा किंवा विधानपरिषद नको आहे. देशाला पुढे नेण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच मी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहे. त्याचबरोबर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे अध्यक्षपद स्विकारणार असल्याच्या चर्चांचे खंडन करताना म्हटले की, तसे असते तर यापूर्वीच झालो असतो.
