वास्तव पोस्ट l जळगाव : येथील डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) मराठी विभाग, भारतीय ज्ञान परंपरा आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. नारखेडे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर बहिणाबाई चौधरी व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांना हार अर्पण करण्यात आले.

यावेळी संगीत विभागाच्या प्रमुख प्रा.ऐश्वर्या परदेशी यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने श्रोतेगण मंत्रमुग्ध झाले. यानंतर कामगार कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन करण्यात आले. प्रा.जे.डी. लेकुरवाळे यांनी ‘विझता विझता स्वतःला’ ही कविता तसेच उपप्राचार्य डॉ. सत्यजीत साळवे यांनी ‘कामगार’ आणि ‘तेव्हा एक कर’ ही कविता सादर केली. प्रा. नयना पाटील यांनी ‘दोन दिवस’ या कवितेतून सामाजिक जीवनाचे वर्णन केले, प्रा.डॉ. संजय रणखांबे यांनी सादर केलेल्या ‘माझे विद्यापीठ’ या कवितेने सर्व श्रोत्यांचे मन जिंकले. तर प्रा. दीपक पवार यांनी’ ‘मास्तर तुमचं नाव लिव्हा…’ ही कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. दीप्ती पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला. कार्यक्रमानंतर ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. आर.के. नारखेडे यांनी २७ फेब्रुवारी हा सुप्रसिद्ध कवी, लेखक कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस तसेच आपली माय मराठी भाषा ही आत्मसन्मानाची भाषा असल्याचे मत मांडले. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू व महात्मा फुले, संत, विचारवंत व विविध लेखक कवी यांची भूमी आहे. लेखक व कवी यांच्या साहित्याने महाराष्ट्राच्या विचारधारेत परिवर्तन केल्याचे प्रतिपादन केले.


याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे, उपप्राचार्य प्रा.डॉ. तायडे व शाहीर दीप्ती पाटील उपस्थित होते. तर डॉ. अनिता कोल्हे, डॉ. मनिषा पाटील, डॉ. शीला राजपूत, प्रा. सायली पाटील, डॉ. हर्षाली पाटील, रेक्टर कामिनी नारखेडे, प्रा.शीतल चौधरी, प्रा. निलिमा पाटील, प्रा. कल्पना खेडकर, राजू अत्तरदे व राजू तायडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. दीपक पवार यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थीनी प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

