जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यात जळगाव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदानाला दोन दिवस असतांनाच उद्धव ठाकरे गटास मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश जैन यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज दि.११ रोजी भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिल्याचे घोषित केले.
सुरेश जैन यांनी तीन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, तसेच राजकारणात सक्रीय न राहता मार्गदर्शकाची आपली भूमिका असेल, असे वक्तव्य केले होते. मात्र तरी देखील जळगावच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगविल्या जात होत्या. त्यातच आज मंत्री गिरीश महाजन, जळगाव लोकसभा महायुतीच्या उमेदवार स्मिता पाटील, आणि सुरेश जैन यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. आणि त्यानंतर सुरेश जैन यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपण महायुतीस पाठिंबा देत असल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केले. नवीन विकसीत भारतात जळगाव जिल्ह्याला मानाचे स्थान मिळावे म्हणून यापुढे मार्गदर्शकाच्या भूमिकेत जळगाव शहर, जिल्हा, राज्य व देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी नेहमीच कटीबद्ध राहील असे ते म्हणाले.
महायुतीस दिलेल्या पाठिंब्याच्या समर्थनार्थ एका पत्रकात सुरेश जैन म्हणतात की, ज्या पक्षात विकासाचं व्हिजन आहे, नियोजन आहे, आणि त्या पक्षाचे नेतृत्व विकसीत भारताचे व्हिजन ठेवून कार्य करीत असेल, तर अशा पक्षाला आणि नेतृत्वाला माझा नेहमीच पाठिंबा राहील. मोदींच्या स्वप्नातील विकसीत भारत घडावा व मी पाहिलेले विकसीत जळगाव जिल्हायाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाला पर्यायाने भारतीय जनता पक्षाला महायुतीला मी जाहीर समर्थन देत आहे. माझी आग्रहाची विनंती आपण आपल्या जळगाव जिल्हाच्या विकासासाठी आपले बहुमुल्य मत जळगाव मतदार संघाच्या उमेदवार स्मिता वाघ व रावेर मतदार संघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या कमळ या चिन्हाला देऊन मोदींचे विकसीत भारत घडविण्यासाठी हात बळकट करुया, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, आ.राजूमामा भोळे, महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिता वाघ तसेच माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
