Headlines
Home » सांस्कृतिक » बोरनार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा ; सर्वत्र भक्तीमय वातावरण हरीनामाचा जागर

बोरनार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा ; सर्वत्र भक्तीमय वातावरण हरीनामाचा जागर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देशचे प्रतिपंढरपूर असणारे श्रीक्षेत्र बोरनार येथे प्रतिवर्षा प्रमाणे पुरातन विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढ एकादशी निमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते आरती करून विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होवू दे अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली.

बोरनार येथे सालाबादाप्रमाणे आषाढ एकादशी पुर्वी सात दिवस आधीपासून मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

पंचक्रोशीतील शाळांमधून विद्यार्थ्यांच्या दिंड्या हरिनामाचा गजर करीत मंदिरात दर्शनाला आल्या होत्या. गावातील युवकांनी एकादशीच्या दर्शनाला येणार्‍या सर्व भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली होती.

आषाढी एकादशीला नोकरी कामधंद्या निमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी, सासुरवाशीणी मुली गावात आलेल्या होत्या. माऊलीच्या दर्शना सोबतच परस्परांना भेटतात. गावातील शेतकरी, कामकरी या दिवशी आपले कामकाज बंद ठेवून विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन जातात.

पारणे सोडण्यासाठी पांडुरंग बोरनारात :
एकादशीचे पारणे सोडतो, एकाशीच्या दिवशी पांडुरंग पंढरपुरात असला तरी पारणे सोडण्यासाठी तो बोरनारला येतो अशी सर्वांची श्रध्दा आहे. त्या दिवशी गावात येणारे सर्व भाविक, पाहूणे रावळे, प्रवासी, पंचक्रोशीतील दिंड्या सर्वांचे एकत्रीत भोजन होते.

सद्गुरू गोविंद महाराजांनी अनेक वर्षा पासून ही परंपरा गावाला सुरू करून दिलेली आहे. त्यामुळे गावात कधीही दुष्काळ पडत नाही असा भाविकांचा अनुभव आहे. एकादशीचा उपवास सोडल्यावर तृप्त मनाने रार्व भाविक पालखी सजवतात आणि तिन्ही सांजेला टाळ मृदुंगाच्या गजरात विठू माऊली गावाच्या दर्शनासाठी पालखीत बसून बाहेर पडतात. हा पालखी सोहळा अत्यंत देखणा व दिमाखदार पद्धतीने पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त तल्लीन झाले होते.

कार्यक्रमाची प्रास्ताविक ट्रस्टी सुरेश जैन यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश चौधरी सर यानी केले तर आभार चेअरमन युवराज देशमुख यांनी मानले.

श्री विठ्ठल मंदिराचे चेअरमन युवराज देशमुख, व्हाईस चेअरमन मधुकर बडगुजर, ट्रस्टी सुरेश लकीचंद जैन, अनिल येशे, अनिल कुलकर्णी, सुनील मराठे, चंद्रशेखर वाणी, सुनील चौधरी, प्रवीण धनगर, ज्ञानेश्वर कोळी, वासुदेव भट यांच्यासह सरपंच समाधान धनगर, उपसरपंच सुरेश थोरात, सदस्य सतीश चौधरी, विभाग प्रमुख सुनील बडगुजर, नाना पाटील, प्रदीप चौधरी, पोलीस पाटील शेखर बडगुजर यांच्यासह वारकरी भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!