जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाचे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. ढोल ताशांच्या गजरात या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे व केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन. भारंबे हे देखील उपस्थित राहणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या युवा स्पंदन कार्यक्रमाच्या उद्घाटनाची सुरुवात उत्स्फूर्त काव्यवाचन आणि भाषण या सत्राने सुरु होणार असून सोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या अभिनव कलागुणांना वाव देण्यासाठी विविध छंद दालनात विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या हस्तकलेच्या वस्तू , पोस्टर्स फोटोग्राफ मॉडल्स तसेच विविध रंगी रांगोळ्या, आणि मेहंदी कला यांचे देखील सादरीकरण होणार आहे. महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात सकाळ-सत्रातच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खमंग रुचकर पदार्थांचे फूड स्टॉल देखील लावण्यात येत असून, लावण्याचे असून विद्यार्थ्यांना उद्या वेगवेगळ्या पदार्थांच्या मेजवानीचा आस्वाद देखील मिळणार आहे.
यासोबतच हास्य प्रधान खेळांचे विशेष आकर्षण राहणार आहे. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे गाता रहे मेरा दिल या सांगीतीक मैफिलीचे विशेष आयोजन मुख्य रंगमंचावर करण्यात आले आहे. तर सायंकाळच्या सत्रात गरबा दांडियाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले आहे,
युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात सकाळी गीत गायन व वादन, तसेच भारतीय प्रादेशिक वेशभूषांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, दुपारच्या सत्रात, नृत्य स्पर्धेचे आयोजन मुख्य रंगमंचावर करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलनात महाविद्यालयाच्या विविध शाखेतील ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून, या विविध कला प्रकारात महाविद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांचे देखील विशेष सादरीकरण करण्यात येत आहे. महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व शाखा निहाय प्रिन्सिपल रोल ऑफ ओनर असे विविध किताब सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा.शोभना कावळे, या स्नेहसंमेलनाच्या प्रमुख असून त्यांना महाविद्यालयाच्या उपप्राचार्य करुणा सपकाळे पर्यवेक्षक राजेंद्र ठाकरे समन्वयक स्वाती बराटे, उमेश पाटील व महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.